Cockroach Janata Party | मराठी तरुणाच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर धुमाकूळ; अवघ्या काही दिवसांत भाजपला मागे टाकत इन्स्टाग्रामवर रचला विक्रम

Cockroach Janata Party | Marathi youth's 'Cockroach Janata Party' creates a social media sensation; Overtaking BJP in just a few days, it sets a record on Instagram

मुंबई :  Cockroach Janata Party | सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका वेगळ्याच राजकीय पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्याचे नाव आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’. हा कोणताही नोंदणीकृत प्रत्यक्ष राजकीय पक्ष नसून, तरुणांनी व्यवस्थेविरुद्ध आणि बेरोजगारीविरुद्ध पुकारलेले हे एक उपहासात्मक डिजिटल आंदोलन आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार ते पाच दिवसांत या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटने तब्बल १० मिलियन म्हणजेच १ कोटीहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. या अफाट लोकप्रियतेमुळे त्यांनी देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीलाही इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकले आहे, जिथे भाजपचे ८.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.

या डिजिटल क्रांतीमागे छत्रपती संभाजीनगर येथील अभिजित दीपके हा ३० वर्षीय मराठी तरुण आहे. अभिजितने नुकतेच बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. या अनोख्या आंदोलनाची सुरुवात एका वादातून झाली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान कथितरीत्या तरुणांची तुलना ‘झुरळांशी’ केल्याचे वृत्त समोर आले होते. सरन्यायाधीशांनी नंतर स्पष्ट केले की, त्यांची टिप्पणी बेरोजगार तरुणांबद्दल नसून बनावट पदव्या वापरून क्षेत्रात येणाऱ्यांबद्दल होती. परंतु, तोपर्यंत सोशल मीडियावर यावरून संतापाची लाट पसरली होती. याच विधानाचा निषेध म्हणून अभिजितने १६ मे रोजी गमतीने ‘कॉकरोच जनता पार्टी’ स्थापन करत असल्याचे जाहीर केले आणि सर्व ‘झुरळांना’ म्हणजेच तरुणांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

हा केवळ एक इंटरनेटवरचा विनोद समजला जात होता, पण अवघ्या काही तासांतच या कल्पनेने रौद्ररूप धारण केले. देशातील कोट्यवधी सुशिक्षित बेरोजगार, पेपरफुटीने त्रस्त झालेले विद्यार्थी आणि व्यवस्थेवर नाराज असलेल्या तरुणांनी या पेजला फॉलो करायला सुरुवात केली. ‘युवकांचा, युवकांसाठी आणि युवकांद्वारे’ असा अजेंडा घेऊन सुरू झालेल्या या पेजवर अतिशय मार्मिक मीम्स आणि उपहासात्मक पोस्टद्वारे देशातील बेरोजगारी आणि ढासळत्या व्यवस्थेवर बोट ठेवले जात आहे.

भाजपच्या ‘अबकी बार ४०० पार’ या घोषणेची नक्कल करत इंटरनेटवर तरुणांनी ‘अबकी बार १० मिलियन पार’ असा ट्रेंड चालवला, जो त्यांनी यशस्वी करून दाखवला. जिथे भाजपने आपल्या अकाऊंटवरून १८,००० पेक्षा जास्त पोस्ट केल्या आहेत, तिथे कॉकरोच जनता पार्टीने अवघ्या ५०-६० पोस्टमध्ये हा मोठा टप्पा गाठला आहे.

या वाढत्या प्रतिसादामुळे राजकीय वर्तुळातही याची मोठी चर्चा सुरू झाली असून, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांसारख्या प्रमुख नेत्यांनीही सोशल मीडियावर या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. इंटरनेट विश्लेषकांच्या मते, हा केवळ एक सोशल मीडिया ट्रेंड नसून देशातील तरुण वर्गाच्या मनातील तीव्र असंतोष आणि उद्रेक आहे, ज्याला डिजिटल माध्यमातून वाट मिळाली आहे. सोशल मीडियावरील हे फॉलोअर्स प्रत्यक्ष निवडणुकीत मतदानात बदलणार का, हा प्रश्न असला तरी या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने डिजिटल जगतात प्रस्थापित राजकीय पक्षांना मात्र चांगलाच घाम फोडला आहे.

You may have missed