Ghodegaon Pune Crime News | पुणे: तलावात कपडे धुताना पाय घसरला; पाण्यात बुडून 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
पुणे / घोडेगाव : Ghodegaon Pune Crime News | आंबेगाव तालुक्यातील बोरघरजवळील कोकणेवाडी येथे तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलीचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १०) घडली असून, गुरुवारी (ता. ११) सकाळी शोधमोहीमेदरम्यान तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मृत मुलीचे नाव अनुश्री चिंतामणी वालकोळी (वय १६) असे आहे. ती नेहमीप्रमाणे घराजवळील तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धूत असताना अचानक तिचा तोल जाऊन पाय घसरल्याने ती खोल पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने आणि परिसरात मदतीसाठी कोणीही नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.
अनुश्री बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेत तलावाकडे धाव घेतली. तलावाच्या काठावर तिचे कपडे आणि चपला आढळून आल्याने अनर्थाची शक्यता व्यक्त करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिस पाटील यांनी घोडेगाव पोलिसांना कळविले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र त्यावेळी यश आले नाही. गुरुवारी सकाळी सहा वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आणि काही तासांतच अनुश्रीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
