Pune Crime News | जमीन खरेदी करुन देण्याच्या नावाखाली महिलेची केली 9 लाखांची फसवणूक
पुणे : Pune Crime News | चाकण परिसरात असलेली जमीन खरेदी करुन देतो, असे सांगून महिलेकडून ९ लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली. तिने पैसे परत मागितल्यावर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत औंध येथे राहणार्या एका ४३ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनोद सोमनाथ राठोड Vinod Somnath Rathod (रा. ठक्कर सिटी, गोडोली, जि. सातारा), देविदास सोमनाथ राठोड (रा. संगमनगर, जि. सातारा), चैतन्य सुनिल जोरी (रा. जय भवानीनगर, पौड रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ पासून आतापर्यंत फिर्यादी यांच्या घरी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन चाकण येथे जमीन असल्याचे सांगितले. ही जमीन खरेदी करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ९ लाख रुपये घेतले. त्यांना जमीन खरेदी करुन दिली नाही. ते जमीन खरेदी करुन देत नसल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी ९ लाख रुपये परत मागितले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर त्यांनी शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी तपास करीत आहेत.
