Pune Crime News | ‘जेव्हा त्यांच्याच सहीची बनावट कागदपत्रे तहसीलदारांसमोर येतात’; शेत जमीन मिळकतीचा फाळणी बाराचा अंमलासाठी तहसीलदारांच्या नावाने बनावट सही शिक्क्याचे आदेश; वाघोली पोलीस ठाण्यात तहसीलदारांची फिर्याद

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | दुसर्‍या मिळकतीसाठी दिलेल्या पत्राचा जावक क्रमांकाचा वापर करुन  केसनंद येथील शेत जमीन मिळकतीचा फाळणी बारा चा अंमल गावाचे दप्तरी घेण्याबाबतच्या कागदपत्रात चक्क तहसीलदार यांच्या आदेशाचे खोटे व बनावट सही शिक्क्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्राम महसुल अधिकार्‍याला तहसीलदार यांच्या सही शिक्याने आलेल्या कागदपत्रांबाबत शंका आल्याने हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारे बनावट सही/ शिक्के बनवुन व आदेश तयार करुन नागरिकांची फसवणूक करणारी साखळी अस्तित्वात असण्याची दाट शक्यता असल्याचा संशय खुद तहसीलदारांनीच आपल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे.

याबाबत तहसीलदार तृत्पी कोलते पाटील (वय ४५) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अरुण दत्तात्रय गायकवाड Arun Dattatray Gaikwad (रा. मोशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार केसनंद ग्राम महसूल कार्यालयात २५ मे २०२६ पूर्वी घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्ती कोलते पाटील या २०२४ पासून तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. पूर्व हवेली तालुक्यातील अपर तहसिलदार कार्यालयाअंतर्गत येणार्‍या ४४ गावांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. केसनंद ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून एक पत्र व त्यासोबतची कागदपत्रे मिळाली. त्यांनी त्यांचे पत्रामध्ये केसनंद गट नंबर १७२ या मिळकतीचा फाळणी बारा व दुरुस्ती गटबुक गावाचे अधिकार अभिलेखास अंमल देणेबाबतचे अर्जदाराचे पत्र तलाठी कार्यालयात सादर केले होते. ग्राम महसुल अधिकार्‍यांना या अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तहसीलदार यांच्या सहीबाबत शंका उपस्थित केली होती. त्याची पडताळणी करुन मिळावी, असे नमूद केले आहे. ग्राम महसूल अधिकार्‍यांनी सादर केलेल्या पत्राची शहानिशा केली असता हे पत्र तहसीलदार कार्यालयाकडून हवेली तालुक्यातील शिरसवडी येथील गटनंबर ४० या मिळकतबाबत ग्राम महसुल अधिकारी, शिरसवडी यांना दिल्याचे हक्क नोंद संकलन पाहता दिसून आले.

तसेच तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांची सही बनावट असल्याचे दिसून आले. तसेच त्यांनी केलेली सही ही तहसिलदार  हवेली, असे पद नमूद केल्याचे दिसले. वास्तविक त्या  तहसिलदार लोणी काळभोर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी व इतर अधिकार्‍यांचे आदेशही बनावट आहेत किंवा कसे याबाबत खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रांची पडताळणी केली असता अकृषिक परवानगी एस आर रजिस्टारचे अवलोकन करता एस आर क्रमांक ७२ पर्यंतच्याच नोंदी आहे. २०२५ च्या एस आर रजिस्टरमध्ये ८९/२०२५ ची नोंद केलेली नाही. तसेच केसनंद येथील गट नंबर १७२ पै़ १० हजार चौरस मीटर क्षेत्रासाठी कोणतेही पत्र/ आदेश देण्यात आलेला नाही. यावरुन केसनंद ग्राम महसुल कार्यालयात दिलेले पत्र बनावट सही शिक्क्याने तयार करुन शासनाची फसवणुक केल्याचे दिसून येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक आहिरे तपास करीत आहेत.

You may have missed