Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात पाऊस 25 जूननंतरच ! मान्सूनचा ‘खंड’ कायम; पुढे सरकण्यास पोषक स्थिती नसल्याने प्रगती मंदावली
मुंबई : Maharashtra Monsoon Update | राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती जवळपास ठप्प झाली असून, 25 जूननंतरच मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्या मान्सून कोकणातील हर्णे ते सोलापूर या पट्ट्यात स्थिरावला असून, पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने त्याची वाटचाल मंदावली आहे. निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, वायव्येकडून येणारे उष्ण वारे, अरबी समुद्रातील उंचीवरील प्रत्यावर्ती वाऱ्यांची प्रणाली आणि कमकुवत मान्सून प्रवाहामुळे त्याच्या पुढील प्रगतीत अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, 8 जूनपासून मान्सून रेषेत विशेष बदल झालेला नाही.
मात्र, 23 जूनच्या आसपास वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. 25 जून ते 1 जुलै या कालावधीत मुंबईसह संपूर्ण कोकणात चांगल्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर मान्सून सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही पुढे सरकू शकतो.
पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षाच
पावसातील खंडामुळे खरीप हंगामातील पेरण्या अद्याप रखडल्या आहेत. पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण होण्यासाठी दमदार पावसाची गरज असून, त्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस संयम बाळगावा लागणार आहे. जूनअखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला होणाऱ्या वातावरणीय बदलांनंतर पेरणीचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
राज्यात उकाड्याचा त्रास वाढणार
मान्सूनच्या प्रतीक्षेत असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 19 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. तर कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून, रात्रीच्या वेळीही उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.
