Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने इस्टेट एजंट, त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न; कोथरुड पोलिसांनी तिघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून चौघांनी इस्टेट एजंट आणि त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. कोथरुड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
आदित्य दादा मारणे (वय २४, रा. साई व्हिला, इंगळेनगर, भुगांव) यांनी कोथरुड पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यांचा मित्र साहिल ठोंबरे याच्या गळ्यावर वार केले असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ऋषिकेश ऊर्फ शुभम मधुकर वाघमारे Rishikesh alias Shubham Madhukar Waghmare (वय २८, रा. न्यू लक्ष्मीनगर, गुजरात कॉलनी, कोथरुड), प्रसाद ऊर्फ मुन्ना भगवान मोरे Prasad alias Munna Bhagwan More (वय २२, रा. तळजाई वसाहत), आदित्य प्रदीप सकटे Aditya Pradeep Sakte (वय २४, रा. न्यू लक्ष्मीनगर, गुजरात कॉलनी, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हरिष वाघमारे (रा. गुजरात कॉलनी) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पौड रोडवर किनारा हॉटेलच्या पुढे चांदणी चौकाकडे जाताना २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य मारणे हे इस्टेट एजंट म्हणून काम करतात. ऋषिकेश वाघमारे हा भाजी विक्रेता आहे. प्रसाद मोरे हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आदित्य सकटे हा जीम ट्रेनर म्हणून काम करत आहे. त्यांची फिर्यादी यांच्याबरोबर यापूर्वी भांडणे झाली होती. फिर्यादी आदित्य मारणे हे मित्रांना भेटण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी गुजरात कॉलनीतील जय मल्हार मित्र मंडळ येथे आले होते. ते मित्रांबरोबर गप्पा मारत असताना ऋषिकेश वाघमारे, प्रसाद मोरे, आदित्य सकटे, हरिष वाघमारे हे तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन मुद्दाम वाद करुन शिवीगाळ करु लागले. त्यामुळे वाद नको, म्हणून आदित्य मारणे हे त्यांचा मित्र साहिल ठोंबरे याच्याबरोबर गाडीवरुन तेथून निघून जाऊ लागले. ते किनारा हॉटेल चौकात आले असताना त्यांच्यामागोमाग आरोपी आले. त्यांनी यांच्या दुचाकीला आडवी गाडी मारली. त्यामुळे दोघे घाबरुन पळून जाऊ लागले. तेव्हा ते एका कारला धडकून खाली पडले.
त्यावेळी ऋषिकेश वाघमारे याने कोयत्याने साहिल ठोंबरे याच्या चेहर्यावर वार केला. तो वार साहिलच्या हनवटीला लागला. त्याने तुला आता जिवंतच ठेवत नाही, असे म्हणून त्याच्या गळ्यावर दुसरा वार केला. त्याला वाचविण्यासाठी फिर्यादी हे प्रयत्न करत असताना प्रसाद मोरे याने दगडाने फिर्यादी यांच्या डोक्यात मारले. आदित्य सकटे याने हाताने मारहाण केली. हरीष वाघमारे हाही साहिल ठोंबरे याला हाताने मारहाण करत होता. हे पाहून लोक जमू लागले. तेव्हा ऋषिकेश वाघमारे याने हातातील कोयता हवेत फिरवुन आता कुणी मध्ये आले तर तुम्हाला पण जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत दहशत पसरविली. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून ते चौघे पळून गेले. दोघांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. साहिल ठोंबरे याच्या गळ्यावर वार झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याच्या हनुवटी व उजव्या अंगठ्याला तसेच दोन्ही गुडघ्याला जखमा झाल्या आहेत. फिर्यादी आदित्य मारणे याच्या डोक्यात मोठी जखम झाली आहे. कोथरुड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी सांगितले.
