Pune Crime News | कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केलेल्या चौघांना बिबवेवाडी पोलिसांनी 8 तासात केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेल्या चौघांना बिबवेवाडी पोलिसांनी ८ तासात धायरीतून जेरबंद केले.
प्रदिप पिंटु कश्यप Pradip Pintu Kashyap (वय १९, रा. शिवतेजनगर, खडके वस्ती), मयुर रोहिदास चव्हाण Mayur Rohidas Chavan (वय २०, रा. विघ्नहर्तानगर), तेजस सोमनाथ आंबुरे ऊर्फ भोला Tejas Somnath Ambure alias Bhola (वय २६, रा. अप्पर ओटा) आणि शरद पिंटु चव्हाण Sharad Pintu Chavan (वय २२, रा. विघ्नहर्तानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुभम सोमनाथ कांबळे (वय ३०) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बिबवेवाडी स्मशानभुमीच्या मुख्य गेटसमोर २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती.
फिर्यादी कृष्णा भारत चौतमहाल, त्यांच्या मामाचा मुलगा शुभम कांबळे व इतर मित्र गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी प्रदीप कश्यप व त्याचे साथीदार दुचाकीवरुन आले. त्यांनी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून शुभम कांबळे याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन याला आज जिवंत सोडायचे नाही, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपी हे वेगवेगळ्या मार्गाने दोन मोटारसायकलवरुन पळून गेले होते. बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींचा शोध घेत असताना ते धायरीच्या मार्गाने गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील ३ तपास पथके तयार करुन ते धायरी गावात शोध घेण्यासाठी सर्व लॉज, मंदिरे चेक करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संजय गायकवाड, शिवाजी येवले व सुमित ताकपेरे यांना आरोपी धायरेश्वर मंदिरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी २२ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास आरोपींना धायरेश्वर मंदिरात ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने चौघांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, अय्याज दड्डीकर, संजीव कळंबे, दत्ता शेंद्रे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे व रक्षित काळे यांनी केली आहे.
