Pune Pimpri Crime News | पुणे : निगडी प्राधिकरणात चेंबरमध्ये अडकून 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू, नागरिकांमधून तीव्र संताप
पुणे / पिंपरी-चिंचवड : Pune Pimpri Crime News | पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळील चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
अमोल शिंदे (वय २०) आणि मनोज शिंदे (वय २६) अशी मृत कामगारांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दोन्ही कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही चेंबरमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दोन्ही कामगारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
याच ठिकाणी दोन दुर्घटनांत पाच कामगारांचा बळी?
विशेष म्हणजे, सुमारे वर्षभरापूर्वी याच मॅनहोलमध्ये काम करताना बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आता आणखी दोन कामगारांचा मृत्यू झाल्याने याच ठिकाणी दोन वेगवेगळ्या दुर्घटनांत आतापर्यंत पाच कामगारांचा बळी गेल्याचे समोर येत आहे.
पूर्वीच्या दुर्घटनेनंतर या धोकादायक चेंबरबाबत आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी कथित प्रशासकीय हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून, या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
