Pune Crime News । सातबारा उतार्‍यावरील कमी केलेले  नाव  पुन्हा लावुन देण्याच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News । सातबारा उतार्‍यावरुन कमी झालेले नाव पुन्हा लावून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची २६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हडपसरमधील बडोदा बँकेच्या शाखेत १५ जुलै २०२२ ते २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडला होता.

याबाबत शेवाळवाडी येथील एका ४३ वर्षाच्या नागरिकाने मांजरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रसाद उद्धव शिरसाठ Prasad Uddhav Shirsath (वय ५०, रा. अमेय सोसायटी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नाव वडिलोपार्जित मालमत्तेच्या सातबारा उतार्‍यावरुन कमी झाले होते. फिर्यादी यांची प्रसाद शिरसाठ याच्याशी हडपसरमधील बँकेत ओळख झाली होती. त्याने आपली महसूल विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चांगली ओळख असल्याची  बतावणी केली होती. सातबारा उतार्‍यावरुन कमी झालेले नाव पुन्हा लावून देण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपीने गेल्या चार वर्षात त्यांच्याकडून वेळोवेळी २६ लाख रुपये घेतले.

आरोपीने सातबारा उतार्‍यावर नाव न लावून दिल्याने फिर्यादी यांनी विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. काम होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. दिशाभूल करुन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ बिनवडे तपास करत आहे.

You may have missed