Pune Police News । तपासाच्या नावाखाली विश्रामबाग पोलिसांचे सातारा पर्यटन, महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना शिक्षा

Pune Police News

पुणे : Pune Police News । कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी महिलेला घेऊन जाऊन तपास करण्याऐवजी सातारा येथे पर्यटन करणार्‍या महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलिसांना अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावणी आहे. चीड आणणारी गोष्ट म्हणजे मध्यरात्रीनंतर पुण्यात परत आलेल्या या पोलिसांनी फिर्यादी महिलेला घरी सोडण्याऐवजी नारायण पेठ पोलीस चौकीबाहेर सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक स्वरुपा नाईकवाडे, पोलीस हवालदार श्रीहरी पाटील आणि पोलीस अंमलदार कोमल कांबळे अशी शिक्षा सुनावलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे तिघेही विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीला आहेत.

फिर्यादी महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी केल्यावर त्यातून हा प्रकार पुढे आला आहे.

विश्रामबाग पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे यांच्याकडे होता. घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ४ एप्रिल रोजी फिर्यादी महिलेला घेऊन हे तिघेजण सातारा येथे गेले होते. सातारा येथे पोहचल्यानंतर नाईकवाडे यांनी स्थानिक पोलिस ठाण्यास कळवून त्यांची मदत घेऊन तपास करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे न करता तेथील एका प्रसिद्ध  ढाब्यावर हजेरी लावली. त्यानंतर दुपारी सव्वा तीन वाजता ते शाहुपूरी पोलिस ठाण्यात गेले. पंचनामा करण्यासाठी गेले असताना, आजुबाजूचे रहिवासी किंवा घटनास्थळावरील व्यक्तीकडे कोणताही तपास केला नाही.

घटनास्थळाचा पंचनामा करुन त्यांनी पुण्याला परत येणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी तसे न करता सातारा जवळील कास पठार व इतर प्रेक्षणीय स्थळे पाहत राहिले. फिर्यादी महिलेने आपली आई आजारी असून ती घरी एकटी आहे. त्यामुळे घरी लवकर जाणे आवश्यक असल्याचे सांगितले, तरी पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घेतला.  परत येताना एका महिला पोलीस कर्मचार्‍याच्या घरी जेवण करण्यासाठी थांबले. त्यानंतर मध्यरात्रीनंतर एक वाजता  पुण्यात आले. पुण्यात आल्यावर या महिलेला तिच्या घरी सोडण्याऐवजी तिला सुरुवातीला स्वारगेट येथे सोडण्याचा प्रयत्न केला.  महिलेने विनंती केल्यावर तिला नारायण पेठ पोलीस चौकीबाहेर मध्यरात्री एकटीला सोडून देण्यात आले.

या महिलेने तक्रार केल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला. या अहवालात महिला पोलीस उपनिरीक्षकांसह तिघांनी सातारा येथे जाऊन कोणत्याही प्रकारचा तपास  मोघम स्वरुपाचा तपास करुन तेथील पर्यटन स्थळे पाहण्यात दंग होते. फिर्यादी यांना तपासकामी घेऊन जाऊन त्यांच्या गुन्ह्याचा तपास न करता फक्त मौजमजा केली. तुमच्या कर्तव्यामध्ये अंत्यत बेशिस्त, बेजबाबदार, निष्काळजीपणाचे, हलगर्जीपणाचे वर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होईल, असे वर्तन करुन कर्तव्यात अक्षम्य अशी गंभीर चुक केल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांना पुढील देय वार्षिक वेतनवाढ २ वर्ष कालावधीसाठी अपरिणामकारकरित्या रोखणे, ही शिक्षा अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दिली आहे. 

You may have missed