Pune Crime News | गुंतवणुकदारांची फसवणूक करुन दुबईत फरार झालेल्या 8 जणांविरुद्ध रेड कॉर्नरचा प्रस्ताव; आर्थिक गुन्हे शाखेचा फरार 26 जणांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सुरु
पुणे : Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिषाने लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करुन दुबईत पळून गेलेल्या ८ जणांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने रेड कॉर्नर नोटीस काढण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. गुंतवणुकदारांची फसवणूक करुन दुबई व इतर देशांमध्ये पळून गेलेल्या अशा २६ जणांची यादी आर्थिक गुन्हे शाखेने तयार केली असून त्यांना भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणुक करुन एपीएस वेल्थ व्हेंचर्स एचएलपीचा संचालक अविनाश अर्जुन राठोड Avinash Arjun Rathod हा दुबईला पळून गेला होता. त्याचे भारतात प्रत्यार्पण करायला नुकतेच लावण्यात आले होते. भारतात आल्यावर त्याला अटक करण्यात आली. ही प्रत्यार्पण प्रक्रिया यशस्वी झाल्याने आता दुबई व इतर ठिकाणी पळून गेलेल्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी आवश्यक त्या हालचाली पुणे पोलिसांनी सुरु केली आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक करुन फरार झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी ८ जणांचे रेड कॉर्नर नोटीस प्रस्ताव तयार केला आहे. इंटरपोलच्या माध्यमातून तो बजाविला जाणार आहे. त्यात अमर बिरादार आणि त्याची पत्नी ज्ञानेश्वरी अमर बिरादार यांच्याविरुद्ध कोथरुड, चतु:श्रृंगी, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी दरमहा ४ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांनी जवळपास ९ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक करुन परदेशात फरार झाले आहेत.
विनोद कुटे व इतरांनी वेगवेगळ्या स्कीम तयार करुन त्याद्वारे लोकांकडून पैसे घेतले. त्यांनी शेल कंपन्यांमार्फत परदेशात पैसा पाठवला. १४ कोटी ८० लाख रुपयांची फसवणुक करुन ते दुबईला पळून गेले आहेत.
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली ११ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करुन निखिल चढ्ढा हा दुबईला पळून गेला आहे. तेथून तो आपल्या पत्नीशी संपर्कात असल्याचे सांगितले जाते. भारतीय यंत्रणांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, पुण्यात फसवणुक करुन दुबई व इतरत्र पळून गेलेले असे एकूण २६ जणांविरुद्ध पुण्यात गुन्हे दाखल आहेत. यापैकी बहुतांश फरारी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे गोळा करणारे आहेत. अविनाश राठोड याचे नुकतेच दुबईहून भारतात प्रत्यार्पण झाले. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया कशी असते. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, याची जाण सर्वांना आली आहे. त्यानुसार आता ८ जणांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सर्व फरार २६ जणांना परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
