Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन केला खुन, पानमळा वसाहतीतील रात्रीची घटना
पुणे : Pune Crime News | आंबेगाव पठार येथील भांडणातून मिरवणुक पाहण्यासाठी आलेल्या तरुणाला टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन त्याचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
शुभम राजू घोडके (वय २२, रा. चरवड वस्ती, वडगाव) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. पर्वती पोलिसांनी तीन ते चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील पानमळा वसाहत येथील वृंदावन नर्सरीजवळ शनिवारी रात्री ९ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम घोडके हा वडगाव येथील एका वाशिंग सेंटरमध्ये काम करतो. त्याचे आंबेगाव मधील काही जणांबरोबर पूर्वी भांडणे झाली होती. तो शनिवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुक पाहण्यासाठी सारसबाग येथे आला होता. मिरवणुक पाहून तो रात्री घरी परत जात होता. त्याच्याबरोबर त्याचा मेव्हणाही होता. ते वृंदावन नर्सरीजवळ थांबले असताना त्यांच्या भागातील टोळके तेथे आले. त्यांनी शुभम याला पाहिल्यावर “हा पठारावरचा आहे मारा याला” असे म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शुभम यांच्या मेव्हण्याने त्याला वाचविले. त्यानंतर हे टोळके पळून गेले . शुभम व त्याचा मेव्हणा हे रिक्षाने घरी निघाले. वाटेत शुभम याला खुप त्रास होऊ लागला. तेव्हा त्याच्या घरच्यांना बोलावून शुभमला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम घोडके याचा मृत्यु झाला. पर्वती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले तपास करीत आहेत.
