Pune Crime News | पुणे : हडपसरमधील अमनोरा गोल्ड टॉवरमधून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि घटस्फोटाच्या तणावाचा प्राथमिक संशय
पुणे : Pune Crime News | हडपसर येथील अमनोरा गोल्ड टॉवरमध्ये राहणाऱ्या ३३ वर्षीय आयटी अभियंत्याने १५व्या मजल्यावरील सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि घटस्फोटाच्या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हडपसर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मृताचे नाव राहुल वेदाभ्यास पटेल (वय ३३, मूळ रा. ओडिशा) असे असून, ते अमनोरा गोल्ड टॉवरमधील १५व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १५०३ मध्ये भाड्याने राहत होते. संबंधित सदनिका मृणाल सोनू कुमार यांच्या मालकीची आहे. राहुल हे पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून सातत्याने वाद होत होते. मतभेद वाढत जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. या मानसिक तणावातून त्यांनी मध्यरात्री सदनिकेतून उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
डिजिटल लॉकमुळे पोलिसांना घरात प्रवेश करण्यास विलंब
घटनेनंतर मोठा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी घटनास्थळी धावले. खाली पडलेल्या व्यक्तीची ओळख पटवल्यानंतर तो १५व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत असल्याचे समोर आले. मात्र, फ्लॅटला डिजिटल लॉक असल्यामुळे पोलिसांना तातडीने आत प्रवेश करता आला नाही. त्यानंतर राहुल यांच्या पत्नीशी संपर्क साधून लॉकचा पासकोड मिळवण्यात आला. लॉक उघडल्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश करून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, घटनेची माहिती राहुल यांच्या वडिलांना देण्यात आली आहे. ते ओडिशाहून पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
