Pune Crime News | जमीन विकसित करुन फ्लॅटची विक्री करुन पैसे मागितल्यावर आत्महत्येची धमकी देऊन पावणे तीन कोटींची फसवणूक करणार्या आर के लाईफस्पेस डेव्हलपर्सचे बिल्डर रुपेश कुंबरेसह पत्नीवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | जमीन विकसित करताना जागा मालकाच्या वाटणीला आलेल्या फ्लॅटची विक्री करुन ते पैसे स्वत: घेतले. पैशांची मागणी केल्यावर बिल्डरने आत्महत्येची धमकी दिली. त्याच्या पत्नीने खोट्या केसमध्ये अडकवून जेलला पाठवण्याची धमकी दिली. २ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणुक करणार्या बांधकाम व्यावसायिक पतीपत्नीवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रुपेश हरीभाऊ कुंबरे Rupesh Haribhau Kumbre (वय ४५) आणि त्यांची पत्नी कांचन रुपेश कुंबरे Kanchan Rupesh Kumbre (वय ४३, दोघे रा. ऋषिकेश, आझादनगर, कोथरुड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत तुषार गणपत दगडे (वय ३४, रा. बांदल इस्टेट, उत्तमनगर, बावधन) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना आर के लाईफस्पेस डेव्हलपर्स येथील कार्यालयात २०११ ते १२ मार्च २०२६ दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची उत्तमनगर येथे वडिलोपार्जित मालकीची जागा होती. त्यांच्या कुटुंबातील वाटणीत त्यांच्या वडिलांच्या नावे ७८ गुंठे जागा आली. त्यांचे वडिल व चुलते मनोहर दगडे यांनी त्यांच्या मालकीचा असलेला प्लॉट विकसित करण्यासाठी आर के लाईफ स्पेस डेव्हलपर्सचे रुपेश कुंबरे यांच्याबरोबर करार केला. इमारतीमधील ५० टक्के भागीदारी देण्याचे ठरले. २०१३ मध्ये प्रत्यक्ष काम चालु केल्यानंतर त्यांच्या बांधकाम क्षेत्र वाटपाबाबत करार करण्यात आला. बिल्डिंगमधील १२ फ्लॅट त्यांच्या वाटणीस येणार होते. करार करताना बिल्डरने दिलेले दीड कोटी रुपयांच्या बदल्यात त्यांना एक फ्लॅट देण्यात आला . उरलेल्या ११ फ्लॅटबाबत करारनामा झाला. २०१६ मध्ये बांधकाम पूर्ण झाले.
मनोहर दगडे यांनी ४ बीएचकेचे २ फ्लॅट स्वत:कडे ठेवले. आर के ग्रेसिया बिल्डिंगमधील फ्लॅट विक्री करताना रुपेश कुंबरे याने माझ्याकडे आलेल्या ग्राहकांना तुम्हाला दिलेले फ्लॅट आवडतात, असे सांगून त्यांनी काही फ्लॅटची आदलाबदली केली. तसेच तुमचे फ्लॅट दीड कोटी रुपयांना विकून देतो, असे सांगितले. २०१८ -१९ मध्ये रुपेश कुंबरे याला बांधकामाकरीता पैशांची आवश्यकता असल्याने त्याने फिर्यादी यांच्या मालकीच्या ३ फ्लॅटवर खासगी संस्थेकडे गहाण ठेवून ८ कोटींचे कर्ज काढले. रुपेश कुंबरे याने फिर्यादी यांच्या वाट्याला आलेल्या फ्लॅटची विक्री करुन ५ कोटी २९ लाख ६१ हजार ३०० रुपये एवढी रक्कम स्वत:च्या बँक खात्यावर घेतली होती. त्यांनी पैसे मागितल्यावर त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली. त्यांचे काका मनोहर दगडे यांना त्या बदल्यात दुसरी जमीन किंवा मालमत्ता देत असल्याचे आमिष दाखविले.
फिर्यादी यांच्या हिश्यात येणारे २ कोटी ६४ लाख ८० हजार ६५० रुपये याबाबत त्यांनी रुपेश कुंबरे व कांचन कुंबरे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. पैशांची मागणी केल्यावर कांचन कुंबरे यांनी ‘‘मी महिला आहे, तुमच्या पूर्ण घरदाराला खोट्या केसमध्ये अडकवुन जेलला पाठविण,’’ अशा धमक्या वारंवार देत असे. त्यामुळे त्यांनी घाबरुन आजवर कोठे तक्रार केलेली नव्हती. रुपेश कुंबरे याच्याशी संपर्क केल्यावर तो शिवीगाळ करुन ‘तुला कोठे जायचे तिकडे जा़ मी कोणाला घाबरत नाही तुम्हाला लय माज आला असेल तर या पैसे मागायला हातपाय मोडून टाकून तुझा कार्यक्रम करतो,’ असे बोलून ‘तुमचे नाव चिठ्ठीत लिहून मी आत्महत्या करेन,’ अशी धमकी देऊन रक्कम देण्यास टाळाटाळ करुन आपली फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्यावर दगडे यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.
