DY Patil Passes Away | महाराष्ट्राचा ‘ज्ञानदूत’ हरपला; शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
DY Patil Passes Away | पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील ऊर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी रात्री वृद्धापकाळाशी संबंधित कारणांमुळे त्यांची प्रकृती अधिक खालावली होती.
प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देत लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. शिक्षणासह आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले. त्यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या आणि असंख्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली झाली.
शैक्षणिक कार्यासोबतच त्यांनी आमदार, मंत्री आणि राज्यपाल म्हणूनही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एका प्रेरणादायी पर्वाचा अंत झाला आहे.
