Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडिया’ वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जाहीर निषेध
पुणे : Sunetra Pawar | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहर गटनेते निलेश निकम यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.
निलेश निकम यांनी म्हटले की, काँग्रेस पक्षाला शंभर वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा आहे. मात्र, अशा पक्षाकडून एका महिलेबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलेचा अपमान करणारे हे वक्तव्य असून काँग्रेसने याचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार या सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असतानाही खंबीरपणे उभ्या राहून आपल्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. तसेच कार्यकर्त्यांना आधार देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणे हे संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारे असल्याचे निकम यांनी म्हटले.
“सुनेत्रा पवार यांच्यासारख्या सक्षम महिला नेतृत्वाबाबत ‘गुंगी गुडिया’सारखा शब्दप्रयोग करणे हा केवळ राजकीय विरोध नसून महिलांचा अवमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो,” असे निलेश निकम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने केलेल्या या वक्तव्याबाबत माफी मागावी आणि संबंधित व्यक्तींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.
