Pune Crime News | पुणे : सिंहगड रस्ता खून प्रकरणातील दोघांना अटक; दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात
पुणे : Pune Crime News | वैमनस्यातून २२ वर्षीय तरुणाचा कथित खून करून पसार झालेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
सुजीत सोमनाथ धुतावळे Sujit Somnath Dhutawale (19) आणि आशिष राजू सोनवणे Ashish Raju Sonawane (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरातील समर्थनगरचे रहिवासी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम राजू घोडके आणि त्याचा मेहुणा विष्णू शिवाजी शिरसाठ हे १ ऑगस्टच्या रात्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक पाहून रिक्षातून परतत होते.
पानमळा परिसरात आरोपींनी शुभमला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शुभमचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मेहुण्याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून सुरू होता. पसार आरोपी सिंहगड रस्ता आणि पद्मावती परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीनांनाही ताब्यात घेण्यात आले.
पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपींना पर्वती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
