Pune Crime News | क्रुरपणाचा कळस! घरगुती वादातून भावजयीने 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हि क्विक टाकून केले गंभीर जखमी; बाळावर आयसीयुमध्ये उपचार
पुणे : Pune Crime News | मोठ्यांच्या घरगुती भांडणांमध्ये भावजयीने आपला राग ९ महिन्यांच्या बाळावर काढला. या ९ महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकले. त्यामुळे या बाळाचे तोंडाला जखमा झाल्या असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे. लोहगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
फेव्ही क्विकमध्ये सायनोएक्रिलेट हे केमिकल असते. त्यात एथिल सायनोएक्रिलेट स्टेबलाइजर्स आणि थिकनेस वाढविण्यासाठी रसायन टाकले जाते. त्याचा हवेशी संपर्क झाल्याबरोबर ते घट्ट होऊन जोडले जाते.
याबाबत अल्ताप नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सानिया शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव), रियाज इमाम हाल्याळ Riyaz Imam Halyal (वय ४८, रा. कांदिवली, मुंबई) आणि हाजी मलंग शेख Haji Malang Sheikh (रा. कांदिवली, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोहगावमधील कलवड वस्ती येथील त्यांच्या राहत्या घरात ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताप शेख व त्यांचा भाऊ एकत्र रहात राहतात. त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरुन वादावादी झाली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरुन सानिया शेख हिने अल्ताप शेख यांच्या ९ महिन्याच्या अली या मुलाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकले. त्यामुळे या बाळाच्या तोंडात जखमा झाल्या. त्याला उलटी झाल्याने हा प्रकार त्याची आई जैनाब शेख हिच्या लक्षात आला. बाळाचे ओठ चिकटल्यासारखे झाल्याने त्या घाबरल्या. त्यांनी तातडीने आपल्या पतीला फोन करुन हे कळविले. त्यांनी बाळाला ससून रुग्णालयात आणले. तेथे त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार करण्यात आले. आता मुलाची तब्येत सुधारत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांनी सांगितले.
फिर्यादी यांची पत्नी जैनाब शेख हिने सानिया शेख यांना विचारले असताना तिने कोणाला सांगितले तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तिचे नातेवाईक रियाज हाल्याळ, हाजीमलंग शेख हे हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी जैनाब शेख यांना मुलगा व्यवस्थित असून मुद्दाम त्यांची मुलगी सानिया शेख यांच्या विरुद्ध तक्रार दिली तर तुला दाखवितो, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले तपास करीत आहेत.
