Pune Accident News | भरधाव मोटारीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; लोणी काळभोरमध्ये चालकाविरुद्ध गुन्हा
पुणे : Pune Accident News | पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत ७० वर्षीय पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाराम रामाजी बावरी (वय ७०, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. मोटार चालक ऋतिक दत्तात्रय सोनवणे Rutik Dattatray Sonawane(रा. मांगडेवाडी, कात्रज) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत बावरी यांची मुलगी भुरी रमेश भाटी (वय २६, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास बावरी हे कुंजीरवाडी परिसरात पुणे-सोलापूर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
जखमी बावरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अरुण जाधव करत आहेत.
