Pune Cyber Crime | ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत निवृत्त कर्मचाऱ्याची 19 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक

Cyber Crime AI

पुणे : Pune Cyber Crime | बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी ६४ वर्षीय निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याची १९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे चिंचवड परिसरात राहणारे निवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. त्यांचे बँक खाते डेक्कन जिमखाना परिसरातील एका बँकेत आहे.

२९ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. “तुमच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करण्यात आला आहे. तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले जाणार असून, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील,” अशी भीती त्यांना दाखवण्यात आली.

या धमकीला घाबरून तक्रारदाराने कोणतीही शहानिशा न करता चोरट्यांनी दिलेल्या खात्यात १९ लाख ४५ हजार रुपये जमा केले. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सपना देवताळे करत आहेत.

You may have missed