Pune ACB Demand Trap | इमारतीचा पाया खोदताना जादा खोदकाम केल्याने 10 लाखांची लाच मागणार्या शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर अँटी करप्शनकडून FIR
पुणे : Pune ACB Demand Trap | सेनापती बापट रोडवरील इमारतीचा पायासाठी खोदकाम करताना जादा खोदकाम केल्याने २ कोटी रुपयांचा दंड बसेल, असे सांगून १० लाख रुपयांची लाच मागणार्या शिवाजीनगरच्या तलाठी व कोतवाल यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे Ashwini Dattatray Kokate (वय ३७) आणि कोतवाल महेश मधुकर मुंढे Mahesh Madhukar Munde (वय ३०) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही शिवाजीनगर तलाठी कार्यालयात कार्यरत आहेत.
तक्रारदार हे व्यवसायाने खोदकाम ठेकेदार आहेत. त्यांच्या फर्मकडून सर्वे नंबर ९६७ सेनापती बापट रोड या ठिकाणी एका व्यावसायिक प्रकल्पासाठी इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरु होते. त्या खोदकामाचा पंचनामा तलाठी अश्विनी कोकाटे यांनी केला. तक्रारदार यांनी ३२०० ब्रास जास्त खोदकाम केले असून त्यावर २ कोटी रुपयांचा दंड बसत असल्याचे सांगितले. तहसीलदार यांच्याकडे निल पंचनाम्याचा अहवाल सादर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १० लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला १५ जून २०२६ रोजी तक्रार मिळाली.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने १६ जुन रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली. त्यात कोकाटे यांनी पंचनाम्यामध्ये ३२०० ब्रास जास्त खोदकाम केल्याचे दाखवून तहसीलदार यांना निल पंचानाम्याचा अहवाल सादर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन ही लाचेची रक्कम कोतवाल महेश मुंढे याच्याकडे देण्यास सांगितले. तसेच कोतवाल महेश मुंढे याने कोकाटे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवुन कोकाटे यांच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नाही. तरीही लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचाही शोध घेण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांनी ही कारवाई केली आहे.
