Pune Cyber Crime | 150 कोटींच्या आंतरराज्यीय सायबर गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश; आळंदी पोलिसांकडून एकाला अटक

Cyber Crime AI

पुणे/आळंदी : Pune Cyber Crime |  देशातील विविध राज्यांतील नागरिकांना गुंतवणूक आणि ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा आळंदी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणात मोशी येथील २५ वर्षीय सचिन संजय काळे (Sachin Sanjay Kale) याला अटक करण्यात आली आहे. सायबर फसवणुकीतील रक्कम जमा करून घेण्यासाठी टोळीला “म्युल अकाऊंट” उपलब्ध करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

तपासादरम्यान आरोपीच्या नावाने विविध बँकांमध्ये एकूण नऊ खाती उघडण्यात आल्याचे समोर आले. फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये जमा केली जात होती. त्यानंतर एटीएम आणि धनादेशाद्वारे पैसे काढून ते टोळीतील इतर सदस्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील माहितीनुसार, या टोळीशी संबंधित देशभरातील ६५ नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या असून फसवणुकीची एकूण रक्कम सुमारे १५० कोटी रुपये आहे. आरोपीशी संबंधित नऊ खात्यांमधून सुमारे १ कोटी १५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या रॅकेटमधील इतर साथीदार आणि कथित मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींना आपले बँक खाते, एटीएम कार्ड, सिमकार्ड किंवा वैयक्तिक कागदपत्रे वापरण्यास देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. संशयास्पद व्यवहारांसाठी खाते उपलब्ध करून देणे किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरून पैसे काढणे हा देखील गंभीर सायबर गुन्हा ठरू शकतो.

You may have missed