Pune Crime Court News | व्यावसायिकाची सव्वा कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात बिल्डर विशाल चुगेरा यांच्यासह तिघांवर पिंपरी न्यायालयाने काढले अजामीनपात्र वॉरंट

Pune Crime Court News

पिंपरी/पुणे : Pune Crime Court News | व्यावसायिकाची जमीन व्यवहारात १ कोटी २९ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयात उपस्थित न राहिल्याने बांधकाम व्यावसायिक विशाल चुगेरा आणि २ एजंटावर पिंपरी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

बांधकाम व्यावसायिक विशाल अशोक चुगेरा Vishal Ashok Chugera (रा. वानवडी), एजंट मनोज सरसनाथ राय Manoj Sarasnath Ray (रा. पिंपरी), शिवम बनवारीदास महंत Shivam Banwaridas Mahant (रा. वडगाव शेरी) अशी अजामीनपात्र वॉरंट काढलेल्यांची नावे आहेत. पिंपरी न्यायालयातील  सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी हा आदेश दिला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपी अनुपस्थित राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात १० नोव्हेंबर २०२३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गिरीष नवनाथ आव्हाड (वय ४७, रा. सिंध हौसिंग सोसायटी, बाणेर रोड, औंध) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गिरीष आव्हाड यांची केमिकलची कंपनी आहे. ते गुंतवणुक म्हणून जमीन खरेदी करुन ती विक्रीही करतात. त्यांची आणि एजंट मनोज राय याची जमिनीच्या  व्यवहारामधून १० ते १२ वर्षांपूर्वी ओळख झालेली आहे. चिंचवडमधील थरमॅक्स चौकातील हॉटेल नवमी येथे १७ जुलै २०१९ मध्ये मनोज राय हा शिवम मंहत व विशाल चुगेरा यांना घेऊन आला.

विशाल चुगेरा यांची हवेली तालुक्यातील शिरसवाडी येथे प्लॉटिंग असून ती विक्री करीत आहेत. त्यामध्ये अंदाजे २०५०० चौरस फुट क्षेत्र रेडिरेकनरच्या भावात देत असून एक ते दीड वर्षातच त्याचा भाव दुप्पट होणार आहे. त्यावेळी शिवम महंत व मनोज राय यांनी सांगितले की, एक दीड वर्षांनी आम्ही तुम्हाला दुप्पट भावाने सेल करुन देऊ , असे सांगितले. आता तुम्ही १ कोटी १० लाख रुपयांमध्ये गुंतवणूक करुन विकत घेऊन ट्रेडिंग करा. त्या मोबदल्यात तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे, असे सांगून तिघांनी आव्हाड यांचा विश्वास संपादन केला.

विसार पावती करुन देतो, असे सांगितले़ त्यांनी विशाल चुगेरा यांना १ कोटी १० लाख रुपये तसेच कमिशन म्हणून शिवम महंत याला ७ लाख ५० हजार रुपये आणि मनोज राय याला २ लाख ५० हजार रुपये कमिशन म्हणून दिले. त्यानंतर विसार पावती करुन देण्यासाठी त्यांना विचारल्यावर त्यांनी आज करु उद्या करु असे म्हणून टाळाटाळ करत होते. त्यानंतर मनोज राय व शिवम महंत यांना भेटून पैशांबाबत विचारणा केली असता त्यांनी विशाल यांच्याशी भेटून बोलू असे सांगितले. त्यानंतर ते तिघे विशाल चुगेरा याच्या कोंढवा येथील कार्यालयात गेले. तेथे त्यांनी ८ दिवसात तुमचे खरेदीखत  करु. तुमचे कागदपत्र जमा करा, असे सांगितले.

त्यांनी कागदपत्रे दिल्यावर त्यांनी एकूण ६ प्लॉटचे खरेदीचा ड्रॉफ्ट ईमेलवर पाठविला. त्यांनी अजून ८ प्लॉट बाबत विचारणा केल्यावर त्यांनी अजून ८ प्लॉट देणार आहोत काम चालू आहे, असे सांगितले. त्यानंतर लॉकडाऊन लागला. त्यानंतर त्यांनी वारंवार खरेदीचे काय झाले याची विचारणा केली. त्यांनी टाळाटाळ सुरु केली. नंतर फोन उचलायचे बंद केले. त्यानंतर त्यांनी तुमचे प्लॉट नको मला माझी रक्कम परत करा, असे सांगितले. तेव्हा तिघांनी तुला पैसेही मिळणार नाहीत आणि प्लॉटही मिळणार नाहीत, काय करायचे ते कर, असे बोलून त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर त्यांनी फसवणूकीची फिर्याद दिली होती. या खटल्याची सुनावणी झाली तेव्हा तिघेही आरोपी अनुपस्थित होते. त्यामुळे न्यायालयाने तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश दिले आहे. खटल्याची पुढील सुनावणी ७ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे.

You may have missed