Pune Police News | पुणे पोलिसांची पोलिसांवरच ‘डिकॉय टेस्ट’; तक्रार नोंदवून न घेतल्याने कर्मचाऱ्याची दोन वर्षे वेतनवाढ रोखली

Pune Police News | Pune Police's own 'decoy test' on officers; employee's pay hike stopped for two years for not filing a complaint

पुणे : Pune Police News |  नागरिकांच्या तक्रारींवर पोलीस किती तत्परतेने आणि संवेदनशीलतेने कारवाई करतात, याची पडताळणी करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी राबवलेल्या डमी अर्थात डिकॉय स्टिंग ऑपरेशनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा समोर आला आहे. तक्रार नोंदवून न घेता संबंधित व्यक्तीला परत पाठवल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी किसन साळुंखे यांची दोन वर्षांसाठी वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे.

किसन साळुंखे सध्या विमानतळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मात्र, २१ जून रोजी संबंधित घटना घडली, त्यावेळी ते मुंढवा पोलीस ठाण्यात नियुक्त होते.

पोलिसांच्या कार्यपद्धतीची तपासणी करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी एका व्यक्तीला डमी डिलिव्हरी बॉयच्या रूपात तक्रारदार म्हणून मुंढवा पोलीस चौकीत पाठवले होते. रॅश ड्रायव्हिंगच्या घटनेतून शिवीगाळ आणि दमदाटी झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी तो चौकीत गेला होता.

मात्र, चौकीत उपस्थित असलेल्या महिला पोलीस हवालदाराने तक्रार नोंदवून न घेता त्याला मुंढवा पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. त्यानंतर डमी तक्रारदार मुंढवा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी किसन साळुंखे यांच्यासमोर त्याने आपली तक्रार मांडली.

साळुंखे यांनी तक्रार नोंदवून घेण्याऐवजी, “डिलिव्हरी बॉयचे काम करताना सावधपणे वाहन चालवत जा,” असा सल्ला देत कोणतीही नोंद न करता त्याला परत पाठवल्याचे चौकशीत समोर आले.

या प्रकाराची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. प्राथमिक चौकशीत साळुंखे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आणि तक्रारदाराशी बेजबाबदारपणे वागल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

साळुंखे यांनी नोटिशीला खुलासा सादर केला. मात्र, त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची दोन वर्षांसाठी वेतनवाढ स्थगित करण्याची शिक्षा सुनावली.

पुणे शहर पोलिसांनी स्वतःच्या यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी राबवलेल्या या डिकॉय ऑपरेशनमुळे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश पोलीस दलात गेला आहे.

You may have missed