Pune Traffic Issue | पुणे: वाहतूक कोंडीच्या वेळी पोलिस रस्त्यावर का दिसत नाहीत? महापौरांची पोलिस प्रशासनावर नाराजी
पुणे: Pune Traffic Issue | सिंहगड रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून महापौर मंजूषा नागपुरे यांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक पोलिस रस्त्यावर का दिसत नाहीत आणि वाहतूक सुरळीत करण्याऐवजी ते केवळ दंडात्मक कारवाईतच व्यस्त का असतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोंडी नियंत्रित करण्याची पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का, अशी विचारणाही त्यांनी केली.
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत महापौरांनी हे प्रश्न उपस्थित केले. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्याची नाराजी उपस्थितांनी व्यक्त केली. यानंतर महापौरांनी वाहतूक पोलिसांना परिसराचे सर्वेक्षण करून १५ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेकडून आवश्यक उपाययोजनांवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची उपस्थिती असल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, अनधिकृत पार्किंग आणि इतर प्रकारांवर नियंत्रण ठेवता येईल, असेही त्यांनी सांगितले.
रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास पोलिसांनी त्याची माहिती महापालिकेला का देऊ नये, असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला. या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
नगरसेवकांनीही व्यक्त केली नाराजी
बैठकीत नगरसेवकांनी धायरीतील उंबऱ्या गणपती चौकापासून दांडेकर पुलापर्यंत सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत चिंता व्यक्त केली.
कोंडीच्या वेळी वाहतूक पोलिस उपस्थित नसल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वारंवार पत्रव्यवहार आणि तक्रारी करूनही पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला.
