Pune PMC News | ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस निर्मितीच्या निविदेत रिंग ! महापालिका वर्तुळातील चर्चेने प्रशासन सतर्क

Pune PMC News

पुणे : Pune PMC News | ओल्या कचर्‍यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीच्या ३०० टन क्षमतेच्या प्रकल्पातीच्या निविदेचे अ पाकीट उघडले आहे. यामध्ये तीन कंपन्या सहभागी झाल्या आहेत. विशेष असे की या निविदेसाठी प्रत्यक्षात कचरा प्रक्रियेत काम करणारी एकही कंपनी नाही मात्र या कंपन्यांनी कचरा प्रक्रियेत काम करणार्‍या देश विदेशातील कंपन्यांना भागीदार करुन निविदा भरल्या आहेत. या तीन पैकी दोन कंपन्या तर पालिकेच्या प्री बीड मीटिंग बैठकीला देखील उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत रिंग झाल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत असून तांत्रिक छाननी मध्ये दोन कंपन्यांना बाद केले जाईल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

महापालिकेने शहराबाहेर ७५ की.मी. अंतरापर्यंत खाजगी जागेत ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पाची निविदा काढली आहे. प्रकल्पाची जागा ठेकेदाराची असेल .तर प्रकल्प उभारणीसाठी महापालिका केंद्र शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून ४८ कोटी रुपये देणार आहे. या प्रकल्पासाठी प्रति टन ६०० रुपये टिपिंग फी तर प्रति टन ७ रुपये ४० पैसे वाहतूक खर्च पालिका देणार आहे. दोन वर्गात हा प्रकल्प उभारायचा आहे. वाहतूक खर्च हा कचरा वाहून नेणार्‍या वाहनाचा जाण्या येण्याच्या प्रवासाचा अर्थात अधिकतम १५० की. मी. साठी असेल.

या प्रकल्पासाठी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यामध्ये स्वयंभू ट्रान्सपोर्ट , साई पवनी कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा. लि. आणि कृष्णाई इन्फ्रास्टकचर प्रा. ली. या कंपन्यांचा समावेश आहे. या तिन्ही पैकी एकाही कंपनीला कचरा प्रक्रियेचा अनुभव नाही. तर स्वयंभू वगळता उरलेल्या दोन पैकी एकही कंपनी महापालिकेच्या प्री  बीड मीटिंगला उपस्थित न्हवत्या.

कचर्‍यापासून बायोगॅस तयार करण्याचे काम करणारी आणि सुस येथे महापालिकेचा प्रकल्प चालवणारी कंपनी देखील प्री बीड मीटिंगला उपस्थित होती. मात्र या कंपनीने निविदा भरली नाही, यामुळे संशय अधिक बळावला आहे. प्री बीडला उपस्थित कंपन्यांनी कचरा प्रक्रियेचा अनुभव असलेल्या देश विदेशातील कंपनीशी भागीदारी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार या तिन्ही कंपन्यांनी देश विदेशातील कंपन्यांशी भागीदारी करून निविदा भरल्या आहेत.

दरम्यान, एकाच कंपनीला काम मिळवून देण्यासाठी ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी वेळोवेळी ’ प्रशासनाचे नाक दाबण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. निविदेत पुरेशी स्पर्धा होण्यासाठी एजंटांनी दोन कंपन्या स्पर्धेत उतरवल्या आहेत. कागदपत्रांच्या छाननीत या दोन कंपन्या बाद ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यानंतर  अधिकतम सुमारे १ हजार ६५० रुपये टन दराने कामाची एकच निविदा मंजुरीसमाठी ठेवण्यात येईल अशी जोरदार चर्चा आहे. या प्रकल्पाचे अ पाकीट उघडले असून तांत्रिक पडताळणी केल्यानंतरच ब पाकीट अर्थात दर पाकीट उघडण्यात येईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारूळे यांनी दिली.

तर निविदा रद्द करण्यात येईल

कचर्‍यापासून सीबीजी तयार करणार्‍या प्रकल्पाच्या निविदा आल्या आहेत. प्रकल्पाची व्यवहार्यता आणि आर्थिक दरांचा विचार करण्यात येईल. प्रक्रियेचा दर परवडणार असेल तरच या प्रकल्पात पुढे निर्णय घेण्यात येईल. अन्यथा ही निविदा रद्द करण्यात येईल. बीपीसीएल या कंपनीने ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस निर्मितीसाठी प्रस्ताव दिला आहे. विशेष असे की यासाठी महापालिकेला केवळ जागा उपलब्ध करून द्यायची आहे. यासाठी महापालिकेला कुठलाही खर्च येणार नाही. या प्रस्तावाचा अग्रक्रमाने विचार करण्यात येत आहे.- नवल किशोर राम, महापालिका आयुक्त.

You may have missed