Pune Baramati Crime | ‘दृश्यम’सारखे करण्याचा बारामतीत प्रयत्न ! पतीला विषारी औषध देऊन बेशुद्ध करुन घरात कट्टा बांधून त्यात पुरुन पतीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Baramati Crime | कौटुंबिक कारणावरुन पतीला विषारी औषध देऊन पत्नीने त्याला बेशुद्ध केले. हॉलच्या गॅलरीमध्ये कट्टा बांधून त्यात पुरुन कडाप्पा लावून जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांना ११२ वर कॉल मिळाल्यावर पोलिसांनी जाऊन या बेशुद्ध तरुणाचा जीव वाचवुन त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
प्रविण प्रकाश जगताप (वय ४१, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) असे या तरुणाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांचे वडिल प्रकाश कन्होबा जगताप (वय ७१, रा. ढाकाळे, बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शर्मिला प्रविण जगताप Sharmila Pravin Jagtap (वय ३८, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) हिच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला आहे. ही घटना ३० जुलै रोजी रात्री साडे अकरा ते १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.
‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगण हा पोलीस स्टेशनच्या खालीच मुलाला गाडताना दाखविला आहे. तसाच काहीसा प्रकार बारामतीमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणावरुन प्रविण आणि शर्मिला जगताप यांच्यात भांडणे होत होती. शर्मिला हिने प्रविण याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोणते तरी विषारी औषध देऊन त्याला बेशुद्ध केले. तो अर्धवट बेशुद्ध असताना त्यास बॅटने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घरातच पुरून टाकण्यासाठी तिने हॉलच्या गॅलरीत चौकोनी कट्टा बांधला होता. त्यात बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेल्या प्रविणला झोपविले. तो चौकोनी कट्टा कडापा फरशी लावून बंद करण्याचा प्रयत्न केला. रात्रभर तिने हे सर्व केले. दरम्यान, कोणीतरी ११२ वर पोलिसांना कॉल करुन माहिती दिली. पोलीस तातडीने तेथे पोहचले. त्यांनी चौकोनी कट्ट्यातून प्रविण जगताप याला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून तो अद्याप बोलण्याच्या स्थितीत आला नाही. जगताप कुटुंब सुरुवातीला तक्रार देण्यास तयार नव्हते. शेवटी वडिलांनी बुधवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. बारामती शहर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले तपास करीत आहेत.
