Pune Cyber Crime | क्रिप्टो गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष; सासवडमध्ये महिलेची 21.75 लाखांची फसवणूक
पुणे : Pune Cyber Crime | क्रिप्टो कॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास ४० टक्के बोनस कॉइन, दरमहा चार ते पाच टक्के परतावा तसेच गुंतवणुकीवर दुप्पट ते पाचपट नफा मिळेल, असे आमिष दाखवून सातारा जिल्ह्यातील एका महिलेची २१ लाख ७५ हजार ९०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हर्षदा अमोल मुऱ्हे (रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ट्रिलेनियर कंपनीच्या ‘टीएलसी २.०’ प्री-लाँच क्रिप्टो कॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे सांगून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध तारखांना आरटीजीएस आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे अनिता प्रकाश जगताप आणि कालिका ज्ञानेश्वर शिंदे यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण २१ लाख ७५ हजार ९०० रुपये जमा करून घेतल्याचा आरोप आहे.
सुरुवातीला काही रक्कम परत करून आरोपींनी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला. मात्र, त्यानंतर मूळ गुंतवणूक आणि उर्वरित परतावा देण्यास टाळाटाळ करण्यात आली. कंपनीचे मार्केट घसरल्याचे कारण देत पैसे परत करण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपींनी इतर गुंतवणूकदारांनाही अशाच प्रकारे भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
या प्रकरणी शुभम प्रकाश जगताप Shubham Prakash Jagtap , संतोष कटके, संकेत इनामके, अनिता प्रकाश जगताप Anita Prakash Jagtap (सर्व रा. सासवड) आणि कालिका ज्ञानेश्वर शिंदे Kalika Dnyaneshwar Shinde (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहेत.
