Pune Crime News | ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाला अडवले; हातचलाखीने 1.19 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
मंचर / पुणे : Pune Crime News | पोलिस असल्याचा बनाव करून एका व्यक्तीला रस्त्यात अडवत सुमारे १ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे घडली. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश गुरुसंगप्पा पाटील (वय ५९, रा. एकलहरे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील सकाळी सुमारे ११.३५ वाजता दुचाकीवरून मंचरहून एकलहरेकडे जात होते. पुणे-नाशिक महामार्गालगत एकलहरे गावाच्या हद्दीत काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले.
दोघांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले. परिसरात एका महिलेचा खून झाला असून, तिचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत आणि आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत, असे त्यांनी पाटील यांना सांगितले. तसेच सोने घालून प्रवास करणे धोकादायक असल्याचे सांगत त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास भाग पाडले.
आरोपींनी पाटील यांच्या गळ्यातील १६.१०० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि ६.३०० ग्रॅम वजनाची गणपतीचे पेंडंट असलेली सोन्याची अंगठी रुमालात ठेवण्यास सांगितली. त्यानंतर हातचलाखीने खरे दागिने स्वतःकडे ठेवून बनावट पुडी पाटील यांना परत दिली आणि मोटारसायकलवरून पसार झाले.
काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख १९ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मंचर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. अनोळखी व्यक्ती स्वतःला पोलीस असल्याचे सांगून दागिने काढण्यास सांगत असल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
