Pune Crime News | ‘टेलर’च्या चाणाक्षपणामुळे तोतया एअर फोर्स जवानाचे पितळ पडले उघड ! अपघातात मृत्यु पावलेल्या हवाई दलातील जवानाचे बनावट आयकार्ड बनवुन फसवणुक करण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | आपण एअर फोर्समध्ये जवान असल्याचे सांगून तो लोहगाव येथील बालाजी टेलर शॉपमध्ये ड्रेस विकत घेण्यासाठी गेला. टेलरने त्याला आयकार्ड मागितले. त्याने त्याच्याकडील आयकार्ड दाखविले. हे आयकार्ड पाहिल्यावर त्या टेलरला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. टेलरच्या चाणाक्षपणामुळे तोतया एअर फोर्स जवानाचे पितळ उघडले पडले.
याबाबत हवाई दलाच्या वतीने ब्रिजेशकुमार रामकृष्ण मिश्रा (वय ४८, रा. न्यू प्रोजेक्ट एरिया, एअर फोर्स स्टेशन) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम विलास अंबुरे Shubham Vilas Ambure (वय २६, रा. स्वप्ननगरी, जातेगाव रोड, शिक्रापूर, ता. शिरुर) याला अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम अंबुरे हा गावाकडे आपण एअर फोर्समध्ये नोकरीला असल्याचे सांगतो. तो लोहगावमधील गुरुद्वारा कॉलनी येथील बालाजी टेलर या दुकानात एअर फोर्स जवानाचा ड्रेस विकत घेण्यासाठी गेला होता. दुकानातील मालकाने त्याच्याकडे आयकार्ड मागितले. त्याने त्याच्याकडील आयकार्ड पाहिले. एअर फोर्समधील जवानांची आयकार्ड ते नियमित पहात असल्याने ते आयकार्ड पाहून त्यांना शंका आली. त्यांनी ही बाब लोहगाव पोलिसांना कळविली. लोहगाव पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. तसेच लोहगाव येथील एअर फोर्स कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांना कळविली. पोलीस आणि एअर फोर्समधील अधिकार्यांनी चौकशी केली. त्यात त्याने आपण एअर फोर्समध्ये नसून गावाकडे सांगण्यासाठी बनाव केल्याची कबुली केली. हे आयकार्ड कोठून मिळाले, याची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, २०२२ मध्ये रेल्वे अपघातात एका एअर फोर्स जवानाचा मृत्यु झाला होता. त्यात त्या जवानाचे आयकार्ड दाखवले होते. त्यावरुन बनावट आयकार्ड तयार केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांनी दिली.
