Pune Crime News | देशसेवेची आवड ज्येष्ठ महिलेला पडली 8 लाखांना; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा फेक व्हिडिओ पाहून केली गुंतवणूक
पुणे : Pune Crime News | सोशल मीडियावर अनेक ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री यांच्या नावाने फेक व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यातून ते भारत सरकारच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात. त्यामुळे देशाला खुप फायदा होईल, यामध्य सहभाग नोंदवा, ही गुंतवणुक सुरक्षित आहे, आपले योगदान हे अमूल्य आहे, असे आवाहन करताना दिसतात. त्याला प्रतिसाद देणार्यांची फसवणूक होते. देशसेवेची आवड असलेल्या एका ६२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने त्याला प्रतिसाद दिल्यावर तिची ८ लाख ९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत एका ६२ वर्षाच्या गुरुगणेशनगरमध्ये राहत असलेल्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २२ डिसेंबर २०२५ ते २४ मे २०२६ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा फेक व्हिडिओ ए आय मार्फत तयार करुन तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. फिर्यादी फेसबुक पहात असताना त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला. त्यानंतर त्यांनी गुंतवणुक करण्यासाठी व्हिडिओवर क्लिक केले. त्यात एक अॅप ओपन झाले. त्यात शेअर मार्केट दिसत होते. त्यानंतर सुरेश नावाच्या व्यक्तीने कॉल करुन त्यांची माहिती घेतली. त्यांना टेलीग्राम अॅप ओपन करण्यास सांगितले. त्यांना वेळोवेळी शेअर मार्केटची माहिती देऊन पैसे गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात चांगला परतावा मिळतो, असे आमिष दाखवले. वेळोवेळी वेगवेगळे बँक अकाऊंट देऊन पैसे ट्रान्सफर करण्यात भाग पाडले. त्यांची एकूण ८ लाख ९ हजार १०६ रुपयांची फसवणुक केली. पोलीस निरीक्षक कारोटे तपास करीत आहेत.
