Pune PMC News | पाषाण – पंचवटी – पौड रस्ता भुयारी मार्गासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू
पुणे : Pune PMC News | पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पाषाण–पंचवटी–कोथरूड बोगदा प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली असून या प्रकल्पाच्या निविदापूर्व कामांसाठी तज्ञ सल्लागार नेमण्याची निविदा सोमवारी पुणे महापालिकेने जाहीर केली आहे. या निर्णयामुळे प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पुढे सरकल्याचे मानले जात आहे.
महापालिकेच्या नियोजनानुसार हा बोगदा पंचवटी टेकडीखालून जाऊन पाषाण, पंचवटी, कोथरूड आणि पौड रोड परिसराला थेट जोडणार आहे. सध्या या मार्गावर प्रवासासाठी ४० ते ६० मिनिटे लागत असून बोगदा पूर्ण झाल्यानंतर हा वेळ ५ ते १५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पांतर्गत सुमारे १.७ किलोमीटर लांबीचा चार पदरी भुयारी मार्ग आणि जोडरस्त्यांचे काम प्रस्तावित आहे. अंदाजित खर्च सुमारे २६४ कोटी रुपये असून यापूर्वी डीआरडीओ, एनसीएल, एआरएआय आणि वन विभागाच्या परवानग्या तसेच सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
महापालिकेने जाहीर केलेली नवीन निविदा प्रकल्पाचा सविस्तर आराखडा, तांत्रिक अभ्यास, निविदा कागदपत्रे आणि बांधकामपूर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तज्ञ सल्लागार नेमण्यासंबंधी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम निविदा काढण्याची प्रक्रिया पुढील काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रथम २०१७–१८ च्या महापालिका अर्थसंकल्पात मांडण्यात आला होता.
