Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरात घरातून बेकायदा मद्यविक्री; गुन्हे शाखेचा छापा, दोघांना अटक
पुणे : Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथे घरातून बेकायदा मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने उघडकीस आणला. पोलिसांनी एका घरावर छापा टाकून सुमारे १ लाख २४ हजार रुपये किमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अंकितकुमार सूरजन बिंद Ankitkumar Surjan Bind (वय २०, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) आणि आदित्य राजू शिंदे Aditya Raju Shinde (रा. शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक सिंहगड रस्ता परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी हिंगणे खुर्दमधील साईनगर येथे अंकितकुमार बिंद याने घरात बेकायदा मद्याचा साठा करून त्याची विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचारी पंढरीनाथ शिंदे आणि काटकर यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. कारवाईदरम्यान घरातून सुमारे १ लाख २४ हजार रुपये किमतीच्या देशी आणि विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी बिंद याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशीत त्याने आदित्य शिंदे याने विक्रीसाठी मद्याच्या बाटल्या दिल्याची माहिती पोलिसांना दिली. दोघे मिळून भागीदारीत बेकायदा मद्यविक्री करत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर शिंदे यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांना पुढील कारवाईसाठी सिंहगड रस्ता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
