Pune Crime News | रंगकाम करणार्या सहकारी कामगाराच्या डोक्यात वार करुन केला खुन; आव्हाळवाडीतील स्नेहालया विकलांग संस्थेतील घटनेत दोघा कामगारांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | रंग काम करण्यासाठी आलेल्या कामगारांमध्ये वाद होऊन त्यात दोघा कामगारांनी आपल्या तिसरा सहकारी कामगाराच्या डोक्यात कठीण वस्तूने वार करून त्याचा खुन केला. त्यानंतर ते दोन कामगार पळून गेले आहेत.
धीरेंद्र पासवान (वय ३७, रा. लकुडी निसफिराय, ता. दुबोली, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे खुन झालेल्याचे नाव आहे. सुनिल कुमार (वय ३०), कमलेश (वय ३५) अशी गुन्हा दाखल झालेल्या कामगारांची नावे आहेत. याबाबत सुपरवायझर नितेश राजेंद्र पाटील (वय ३९, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते २० ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी येथील स्नेहालया विकलांग संस्थेतील एका इमारतीचे रंगकाम सुरु होते. त्यासाठी तीन कामगार हे काम करत होते. त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर ते राहत होते. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी काम झाल्यानंतर सुपरवायझर नितेश पाटील हे आपल्या घरी गेले. हे तिघे कामगार तेथेच होते. २० ऑगस्ट रोजी सकाळी ते कामाच्या ठिकाणी आले. तेव्हा धीरेंद्र पासवान हा वरच्या मजल्यावर झोपलेला होता. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर त्याच्या डोक्यातून रक्त आलेले दिसले. त्याचा मृत्यु झाल्याचे दिसून आले. त्याचे दोन साथीदार कामगार कोठेच दिसून येत नव्हते. त्यांनी तातडीने ही बाब वाघोली पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली. धीरेंद्र पासवान याच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण करुन त्याचा खुन केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस या दोन कामगारांचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करीत आहेत.
