Pune Crime News | युनिव्हर्सिटीची बनावट कागदपत्रे दाखवुन डिझायनिंग कोर्सला अॅडमिशन दिल्याचा बनाव करुन 70 विद्यार्थ्यांची फसवणूक; फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या संचालकासह दोघांना अटक
पुणे : Pune Crime News | कलिंगा युनिव्हर्सिटीशी संलग्न असल्याचे भासवून फ्लोरिट कॉलेजची फ्रेंचाइजी असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे दाखवुन डिझायनिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पैसे घेऊन ७० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांची एका बाजुला आर्थिक फसवणूक झाली असून दुसरीकडे त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्रामबाग पोलिसांनी पुण्यातील संचालक आणि फ्लोरिट कॉलेजचा संचालक अशा दोघांना अटक केली आहे.
प्रथमेश अशोक राऊत Prathamesh Ashok Raut (वय २६, रा. पुनावळे) आणि सचिन भिमराव बोराडे Sachin Bhimrao Borade (वय ४२, रा. डोंबिवली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रथमेश राऊत हा पुण्यातील संस्थेचा संचालक असून सचिन बोराडे हा फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग या संस्थेचा संचालक आहे. याबाबत महावीर अशोकचंद दुग्गड (वय ४५, रा. छत्रपती संभाजी नगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी १२ वी पास झाल्यानंतर तिला इंटेरिअर डिझाईनिंगचे शिक्षण घ्यायचे होते. त्यांना इंटरनेटवर फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग या कॉलेजची माहिती मिळाली. त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना पुण्यात येऊन भेटण्यास सांगितले. त्यांनी पुण्यात प्रथमेश राऊत याची भेट घेतली. त्याने फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंगचे पुणे येथील स्टडी सेंटर असून मी हेड असल्याचे सांगितले. त्याने कलिंगा युनिव्हर्सिटीसोबत सलंग्न असल्याची कागदपत्रे दाखविली. त्यानुसार त्यांनी १७ जून २०२६ रोजी कॉलेशमध्ये प्रवेश घेतला.
त्यांनी सुरुवातीला १० हजार रुपये भरले. २१ जुलै २०२६ रोजी त्यांचे कॉलेजचे नियमित वर्ग सुरु झाले. ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलीने फोन करुन सांगितले की आमचे कॉलेज दुसर्या युनिव्हर्सिटीमध्ये संलग्न करणार आहेत. त्यावर त्यांनी संचालकांना फोन केल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी मुलीच्या वर्गातील सर्व मित्र मैत्रिणीच्या पालकांशी संपर्क साधला. ते सर्व पालक समक्ष कॉलेजमध्ये आले. तेव्हा त्यांना समजले की, या संस्थेचा आणि फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग या कॉलेजचा वाद झाला असून त्यांनी पुण्यातील संलग्नता रद्द केली आहे. तेव्हा सर्व पालकांनी आमची फी व मुळ कागदपत्रे परत करा, अशी मागणी केली. तसेच ट्रान्सफर सर्टिफिकेट द्या असे सांगितले. त्याला प्रथमेश राऊत याने नकार दिला. त्यामुळे सर्व ७० पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली.
याबाबत महावीर दुग्गड यांनी सांगितले की, पुण्यातील प्रथमेश राऊत याची संस्था आणि मुंबईतील फ्लोरिट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्यात वाद निर्माण झाल्याने या वर्षी कॉलेजने राऊत याच्या संस्थेला प्रथम वर्गासाठी प्रवेशासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. तसेच त्याने जे काही पैसे घेतले. त्याची कोणतीही माहिती आमच्या कॉलेजला मिळाली नाही. या संस्थेतील दुसर्या व तिसर्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे पैसेही आमच्यापर्यंत पोहचलेले नाही. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून या दुसर्या व तिसर्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना आम्ही पुण्यात सुरु करत असलेल्या दुसर्या कॉलेजमध्ये सामावुन घेऊ, सचिन बोराडे यांनी सांगितले.
पोलिसांपर्यंत हा सर्व प्रकार गेल्यावर पोलीस कॉलेजमध्ये आले़ त्यांनी प्रथमेश राऊत याला सर्व मुलांचे पैसे परत करण्यास व ते मागतात, त्याप्रमाणे ट्रान्सफर सर्टिफिकेट देण्यास सांगितले. त्याला त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.
