Pune Crime News | कर्वेनगरमध्ये आई-वडिलांपासून चुकलेला 10 वर्षीय मुलगा सुखरूप; पोलिसांच्या तत्परतेने कुटुंबाशी पुनर्भेट
पुणे : Pune Crime News | कर्वेनगर येथील वडाचा बसस्टॉप परिसरात आई-वडिलांपासून चुकलेल्या 10 वर्षीय बौद्धिक दिव्यांग मुलाला वारजे माळवाडी पोलिसांनी सुरक्षितपणे त्याच्या आईच्या ताब्यात दिले. बस तपासणी कर्मचारी आणि पोलिसांनी तत्परता दाखवत मुलाच्या पालकांचा शोध घेतल्याने काही वेळातच कुटुंबाची पुनर्भेट झाली.
ही घटना 20 ऑगस्ट 2026 रोजी घडली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील तेजस पुंडलिक खराटे (वय 10) हा आपल्या आई-वडिलांसोबत पुण्यात आला होता. वारजे येथून शिवाजीनगरच्या दिशेने जात असताना वडाचा बसस्टॉपवर बस थांबल्यानंतर तो अचानक खाली उतरला. दरम्यान बस पुढे गेल्याने मुलगा बसस्टॉपवरच राहिला.
यावेळी बस तपासणी करणारे कोथरूड डेपोचे कर्मचारी नितीन सुरेश पगारे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी मुलाला तातडीने कर्वेनगर पोलीस चौकीत आणले.
पोलिसांनी मुलाची चौकशी करून त्याच्याबाबत उपलब्ध माहिती घेतली. त्यानंतर त्याचे आई-वडील ज्या बसमध्ये प्रवास करत होते, त्या बसचा शोध घेऊन पालकांशी संपर्क साधण्यात आला. मुलाची आई सीमा पुंडलिक खराटे यांना कर्वेनगर पोलीस चौकीत बोलावण्यात आले.
ओळख पटवून आवश्यक खात्री केल्यानंतर मुलाला सुखरूप त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. हरवलेला मुलगा सुरक्षितपणे परत मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली कर्वेनगर चौकी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील लोंढे, तसेच अर्जुन नाईकवाडे, गणेश दीक्षित आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी केली.
