Pune Crime News | कोंढवा झालेय अंमली पदार्थांचे हब ! गांजा खरेदीसाठी आलेल्या 155 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात, पहाटे दोन तासात होतेय अंमली पदार्थांची मोठी तस्करी
पुणे : Pune Crime News | कोंढवा हा पुण्याच्या उपनगरातील एक अतिशय गजबजलेला परिसर आता वेगळ्याच कारणाने सातत्याने चर्चेत येत आहे. अंमली पदार्थाच्या खरेदी विक्रीमध्ये कोंढवा हे हब ठरले असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन समोर आले आहे. गेल्या २ दिवसात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तसेच कोंढवा पोलिसांनी गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या तब्बल १५५ जणांना ताब्यात घेतले. त्यात दोघा सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. कोंढवा पोलिसांनी गेल्या २ महिन्यात एकूण १०९ लोकांवर कारवाई केली आहे.
कोंढवा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तस्कर मेसेज करुन सेवन करणार्यांना बोलावतात. पहाटे ५ पासून २ तास तेथे येणार्यांना गांजाची पुडी विकली जाते. गांजा विकत घेण्यासाठी लोक शहराच्या वेगवेगळ्या भागातून तेथे येत असतात. त्यानंतर ते सर्व जण पसार होतात.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला या बाबीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी कोंढवा परिसरात दोन ते तीन दिवस रेकी केली. त्यानंतर २० ऑगस्टच्या पहाटे दोघा सराईतांवर काकडे वस्तीतील शिवनेरी गल्लीत कारवाई करुन पकडले. त्यांच्याकडे ३ किलो गांजा सापडला. या दोघा सराईतांना घेऊन साध्या वेशात पोलीस त्यांच्याबरोबर उभे राहिले. गांजा विकत घेण्यासाठी येणारे बाजूला गाडी लावून त्यांच्याकडे येत होते. त्यांनी गांजा मागितल्यानंतर पोलीस त्यांना पकडून बाजूला नेऊन बसत होते. अशा प्रकारे पहाटे ५ वाजल्यापासून पुढील २ तासात गांजा विकत घेण्यासाठी आलेले ४३ जण टास्क फोर्सने पकडले.
कोंढवा पोलिसांनी दोन दिवस वेगवेगळ्या भागात कारवाई करुन ६१ आणि ५१ अशा ११२ जणांवर कारवाई केली आहे.
कमेला शिवनेरीनगर, अश्रफनगर व इतर भागातील सराईत अंमली पदार्थ विक्रेते यांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एनडीपीएस अंतर्गत एकूण ८ गुन्हे दाखल केले असून ५ लाख ६ हजार ७८५ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. त्यामध्ये २१ जणांना अटक करण्यात आली आहे. कोंढवा भागातील विविध ठिकाणी शोध मोहिम घेऊन २१ अंमली पदार्थांचे सेवन करणार्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. १७ ऑगस्ट रोजी अंमली पदार्थ विक्रीच्या हॉटस्पॉटवर कोंढवा पोलिसांनी गस्त करुन गांजा खरेदी करण्याकरीता आलेल्या तब्बल ६१ जणांना ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
२० ऑगस्ट रोजी कोंढवा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीच्या हॉटस्पॉटवर गस्त करुन गांजा खरेदी करण्याकरीता आलेल्या तब्बल ५१ जणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन अंमली पदार्थांचे सेवनामुळे होणार्या दुष्परिणांची माहिती देऊन त्याबाबत त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले की, अंमली पदार्थ विशेषत: गांजा विक्रीचे कोंढवा हे हब झाले असल्याचे म्हटले जाते. पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन हे सध्या तरी तसे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात आम्ही सातत्याने गस्त घालून सेवनासाठी गांजा खरेदी करण्यासाठी येणार्या लोकांवर कारवाई केली आहे. हे तस्कर रोज त्यांचे ठिकाण बदलत असतात. आज एका ठिकाणी कारवाई केली की, ते दुसर्या ठिकाणी दुसर्या दिवशी विक्री करण्यासाठी जमत असल्याचे दिसून आले आहे. तरीही आम्ही सातत्याने कारवाई करुन परिसरातील अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.
