Pune Accident News | पीएमपी बसमधून पडून तरुणीचा मृत्यू, मागून आलेल्या स्कूल बसच्या चाकाखाली सापडली

Pune Accident News | Young woman dies after falling from PMP bus, found under the wheels of a school bus coming from behind

पुणे : Pune Accident News | सिंहगड रोडवर प्रवाशांनी खचून भरलेल्या बसमधून खाली पडल्याने मागून आलेल्या स्कूल बसच्या चाकाखाली सापडल्याने तरुणीचा मृत्यू झाला.

कांचन खड्डा (वय २५, रा. कृष्णा हॉस्टेल, गिरीनगर, खडकवासला, मूळ रा.राजस्थान) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सिंहगड रोडवरील हॉटेल ब्रह्मा समोरील रोड वर सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानापूर ते स्वारगेट ही बस खानापूरहून स्वारगेटकडे जात होती. बस मध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. ही तरुणी बसच्या पुढील दारात उभी होती. तिला पुढे सरकायला जागा नव्हती. बस सुरू असताना ती अचानक बसमधून खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून स्कूल बस येत होती. खाली पडलेल्या या तरुणीच्या अंगावरून स्कूल बसचे उजव्या बाजूचे मागचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत केली. दोन्ही बसचालक यांना ताब्यात घेण्यात आले असून मेडिकलसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.