Pune Crime News | विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुलटेकडीतील शिक्षकावर गुन्हा दाखल

Crime

पुणे : Pune Crime News | विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुलटेकडी येथील एका पीटी शिक्षकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कॅम्पमधील एका शिक्षकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  मुजाहीद सर असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ही घटना गुलटेकडी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ११ वर्षाचा मुलगा गुलटेकडी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. शुक्रवारी सकाळी तो शाळेत गेला होता. पीटीच्या तासाला तो मित्रासोबत बोलत होता. शिक्षकांनी आपापसात बोलू नका असे सांगितले असतानाही तो मित्राशी बोलत असल्याचे पाहून पीटी शिक्षकांना राग अनावर झाला. त्यांनी हाताने मुलाच्या उजव्या हातावर मारुन त्याच्या उजव्या हाताला दुखापत केली. मुलगा शाळेतून घरी गेल्यानंतर वडिलांनी त्याच्या हाताला लागल्याचे पाहून विचारणा केली. तेव्हा त्याने पीटीच्या शिक्षकांनी मारल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ११५ (२) सह बाल न्याय अधिनियम कलम ७, ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र जगदाळे तपास करीत आहेत.