Pune Crime News | बोहरी आळीत गर्दीचा गैरफायदा घेऊन पर्स चोरणार्या महिलेला जोडप्याने दिले पकडून
पुणे : Pune Crime News | रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात खरेदी करणार्या दोन महिलांच्या पर्स चोरणार्या महिलेला एका जोडप्याने पकडून फरासखाना पोलिसांच्या हवाली केले.
सुजाता महादेव जाधव Sujata Mahadev Jadhav (वय ३६, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेकडे दोन पर्स आढळून आल्या.
याबाबत इंद्राणी अंकुश खडगी (वय ३५,रा. बेवर्ली हिल्स सोसायटी, हिंजवडी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी २२ ऑगस्ट सायंकाळी रविवार पेठेतील बोहरी आळी आदिनाथ चौकात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती आदिनाथ चौकात डेकोरेशनचे सामान खरेदी करीत होते़ खरेदी केलेल्या सामानाचे पैसे दुकानदारास देण्यासाठी त्यांनी लेदरची पर्स उघडली. त्यातील छोटी पर्स शोधली असता मिळाली नाही. त्याचवेळी त्यांच्या शेजारुन एक महिला घाईघाईने जाताना दिसली. त्यांनी त्या महिलेला थांबविले. तेव्हा ती वेगाने जाऊ लागली. तिचा संशय आल्याने त्यांनी तिला पकडून रविवार पेठ पोलीस चौकीत आणले. पोलिसांची तिची चौकशी केल्यावर तिने सुजाता जाधव असे नाव सांगितले. तिच्याकडील बॅगची झडती घेतल्यावर त्यात फिर्यादी यांची छोटी पर्स त्यात ५ हजार २०० रुपये रोख, त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स व तीन डेबीट कार्ड मिळून आले. त्यातील हँड पर्सबाबत सुजाता जाधवकडे चौकशी केल्यावर तिने रविवार पेठेतूनच चोरी केल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करीत आहेत.
