Pune Crime News | रेल्वेच्या बुकिंग क्लार्कला चाकुने जीवे मारण्याचा प्रयत्न करुन जबरी चोरी करणार्या तिघांना बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवलीहून केले जेरबंद
पुण्याहून डोंबिवलीपर्यंतचे 150 सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा घेतला मागोवा
पुणे : Pune Crime News | मध्यरात्रीच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवरुन सिनिअर बुकिंग क्लार्कला बांधुन ठेवून चाकूने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन चोरुन नेणार्या तिघांना बंडगार्डन पोलिसांनी १५० हून अधिक सीसीटीव्हीचा मागोवा घेऊन डोंबिवली येथून जेरबंद केले आहे.
जितेंद्र मोतीराम राठोड Jitendra Motiram Rathod (वय २४, रा. रोकडी,ता. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या रा. मुंब्रादेवी चाळ, भोपरगाव कमानी, डोंबिवली), ईश्वर गोरख चव्हाण Ishwar Gorakh Chavan (वय २३, रा. दसनाबाद, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) आणि अजय मदन चव्हाण Ajay Madan Chavan (वय ३५, तिघे सध्या रा. मुंब्रादेवी चाळ, भोपरगाव कमानी, डोंबिवली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कॅलविन सोलोमन गायला (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) हे १८ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता तिकीट विक्रीचे काम करत असताना दोघा चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील रोख रक्कम, २ मोबाईल, सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले होते.
असा घेतला शोध
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र त्यांचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांच्यातील एक जण लोकलने लोणावळ्याकडे गेला. दुसरा चालुक्य एक्सप्रेसने गेला. ते दोघे लोणावळा येथे एकत्र आले. तेथे त्यांना तिसरा मिळाला. त्यानंतर ते राजकोट एक्सप्रेसने कल्याणला उतरले. तेथून ते लोकलने डोंबिवली येथे गेले. डोंबिवलीला उतरल्यानंतर ते डोंबिवली इस्टला गेले. एका दारुच्या गुत्यावर त्यांनी दारु पिली. बंडगार्डन पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशनपासून ठिकठिकाणची रेल्वे स्टेशनवरील १५० हून अधिक सीसीटीव्हीची तपासणी करुन या चोरट्यांचा मागोवा घेतला. पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाड, सारस साळवी यांनी हे आरोपी भोपरगाव कमानी, डोंबिवली येथे रहात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त केली. त्यानुसार बंडगार्डन पोलीस व पुणे आर पी एफ गोपनीय शाखेच्या पथकाने २१ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
तिघांकडे चौकशी केली असता जितेंद्र राठोड हा रिक्षाचालक आहे. ईश्वर चव्हाण याने बी फार्मसी केले असून तो चाकण येथील कंपनीत कामाला आहे. ते लहानपणापासून मित्र आहेत. ईश्वर चव्हाण याने दोघांना चाकणला बोलावले होते. तेथून मुंबईला परत जात असताना त्यांनी संगनमताने कट रचून हा जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चोरी केलेली रोख रक्कम, २ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, निलेश पालवे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, पुणे आरपीएफ गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार आण्णासाहेब पाखरे, स्वप्नील धनसेर, युवराज गायकवाड यांनी केली आहे.
