Sandeep Khardekar | पुण्यातील खड्डेमय रस्त्यांची केवळ डागडुजी नको, पुनर्बांधणी करा; अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून पाहणी करण्याची संदीप खर्डेकर यांची मागणी
पुणे : Sandeep Khardekar | शहरातील रस्त्यांवरील खड्डे केवळ डांबर आणि खडी टाकून बुजविण्याऐवजी त्यांची शास्त्रीय पद्धतीने पुनर्बांधणी करावी, तसेच महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष दुचाकीवरून शहरातील रस्त्यांची पाहणी करून दुर्दशाग्रस्त रस्त्यांचा अहवाल तयार करावा, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.
खर्डेकर यांनी यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिले असून, पुण्यातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते, गल्ली-बोळांमधील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षांनाही ‘खड्डे बुजवा, अन्यथा रस्त्यावर उतरू’ असा इशारा द्यावा लागत असेल, तर ही पुण्यासारख्या शहरासाठी चिंताजनक बाब असल्याचे खर्डेकर यांनी म्हटले आहे.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था विशेषतः एमएनजीएलच्या कामांमुळे तसेच 24×7 पाणीपुरवठा योजनेसाठी करण्यात आलेल्या खोदाईनंतर अधिक खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्ते पूर्ववत करण्याच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
रस्त्यांवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात खडी आणि डांबर टाकून बुजविणे हा कायमस्वरूपी उपाय नसल्याचे खर्डेकर यांनी स्पष्ट केले. खराब झालेल्या रस्त्यांचा पृष्ठभाग खरवडून, आवश्यक ग्राऊटिंग आणि बेस मजबूत करून त्यानंतर योग्य पद्धतीने डांबरीकरण करणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या तक्रारी किंवा अपघातानंतर केवळ खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी शहरातील खराब रस्त्यांच्या पुनर्बांधणीचा स्वतंत्र आणि दीर्घकालीन आराखडा महापालिकेने तयार करावा, असेही त्यांनी सुचविले आहे.
महापालिकेतील अधिकारी बहुतांश वेळा चारचाकी वाहनांतून प्रवास करत असल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची प्रत्यक्ष जाणीव त्यांना होत नसल्याचे खर्डेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे महिनाभर अधिकाऱ्यांना वेगवेगळे परिसर वाटून देऊन दुचाकीवरून प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करण्यास सांगावे आणि त्यानंतर पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यापूर्वीही शहरातील उपलब्ध निधीचा प्राधान्याने रस्त्यांच्या दर्जासाठी आणि दुरुस्तीसाठी वापर करण्यात यावा, तसेच सुशोभीकरणाच्या तुलनेत मूलभूत नागरी सुविधांकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी केल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.
“लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्रितपणे शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत आणि पुणे शहर अधिक सुरक्षित व राहण्यायोग्य करावे,” अशी अपेक्षा संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली आहे.
