Pune PMC News | श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी बोलण्यात भाजप नगरसेवक ‘नापास’; नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली कोंडी
पुणे : Pune PMC News | भारताचे माजी उद्योग आणि पुरवठामंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी प्रत्येकाने दहा मिनिटे तरी बोलायला हवे, ज्यांना त्यांच्याविषयी माहिती नाही, ती होईल, अशी अचानक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंगळवारी महापालिका सभागृहात केल्याने काही काळ भाजप नगरसेवक कात्रीत अडकले. हे उपरोधिक आहे हे लक्षात आल्यावर आणि आपल्याला त्याचे उत्तर देता येणार नाही लक्षात आल्यावर त्यांनी विरोधाचे शस्त्र उपसले आणि माफीची मागणी करत गदारोळ केला.
भारताचे माजी उद्योग आणि पुरवठामंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे तैलचित्र महापालिकेत लावावे आणि त्याला दरवर्षी पुष्पहार अर्पण करावा, असा प्रस्ताव सभागृह नेते गणेश बिडकर आणि अर्चना पाटील यांनी मुख्यसभेत दिला होता. त्यावर बालवडकर यांनी दुरुस्तीची उपरोक्त उपसूचना दिली होती.
त्यात भारताच्या अखंडतेसाठी बलिदान देणारे, ३७० कलमला सर्वप्रथम विरोध करणारे, एक देश में दो विधान, एक देश में दो निशान, एक देश में दो प्रधान नहीं चॅलेंगे, अशी घोषणा देणारे राष्ट्रभक्त स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठामंत्री, श्यामाप्रसाद मुखर्जी असा उल्ले लेख प्रस्तावात करावा, अशी दुरुस्ती प्रस्तावात करावी अशी उपसूचना बालवडकरांनी दिली.
अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या काही नगरसेवकांचीही नावे बालवडकर यांनी घेतली. ही मागणी उपरोधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच याविषयी कोणालाही बोलता येणार नाही हे लक्षात आल्यावर आपण अपमान करत आहात, आपण शब्द मागे घ्या, माफी मागा अशी मागणी सत्ताधारी भाजप ने करण्याला सुरुवात केली. परंतु एकही नगरसेवक मी मुखर्जींबद्दल बोलू शकतो, असे म्हणाला नाही.
कोणालाही बोलता येणार नाही, हे सभागृहात लक्षात आले. सत्ताधाऱ्यांना उघडे पाडून इप्सित साध्य झाल्यानंतर बालवडकर यांनी विरोधी पक्षनेते ऍड. निलेश निकम यांच्या आदेशानंतर उपसूचना मागे घेतली आणि प्रस्ताव मंजूर झाली.
