Pune Crime News | बहिणीच्या दिराला (भाईला) ‘‘काय अण्णा कसे काय बरे आहे का’’ विचारणे तरुणाला पडले महागात ! भाई, त्याच्या भावाने तरुणाला लोखंडी गजाने मारहाण करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी / पुणे : Pune Crime News | रस्त्याने जाणार्या बहिणीच्या दीराला ‘‘काय अण्णा कसे काय बरे आहे का’’ असे विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. त्याने व त्याच्या भावाने लोखंडी गज, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत अजय रणजित शेडगे (वय २८, रा. दळवीनगर पत्रा शेड, ओटा स्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निखील साहेबराव साठे Nikhil Saheberao Sathe(वय ३२), विष्णु साहेबराव साठे Vishnu Saheberao Sathe (वय ३८, दोघे रा. पत्राशेड, दळवीनगर, ओटा स्किम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी निखील साठे याला अटक केली आहे. ही घटना फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घराच्या अंगणात उभे होते. त्यावेळी त्यांच्या बहिणीचा दीर निखील साठे हा रस्त्याने जात होते. त्यावर फिर्यादी यांनी ‘‘काय अण्णा कसे काय बरे आहे का’’ असे विचारले. त्यावर निखील साठे याने तुला काय करायचे आहे, असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. त्यांनी शिवीगाळ का करता, असे विचारले. त्यावर निखील साठे याने तुला जास्त माज आला आहे. थांब तुला दाखवतो, असे म्हणून तेथे अंगणात पडलेले लोखंडी गज घेऊन फिर्यादी यांना जीवे ठार मारुन टाकतो, असे म्हणून त्याने लोखंडी गज फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्यांनी उजवा हात मध्ये धरल्याने तो गज हाताला लागला. निखील याचा भाऊ विष्णु साठे हा तेथे आला. तो लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागला. निखील याने लोखंडी गजाने फिर्यादीच्या डाव्या पायावर, मांडीवर मारहाण केली.
फिर्यादी हे जमिनीवर पडले असताना विष्णे साठे याने त्यांच्या छातीवर, पोटावर लाथाने मारहाण केली. नाकावर बुक्की मारल्याने त्यांच्या नाकाला दुखापत झाली. त्यांचा आवाज ऐकल्यावर लोक तेथे जमू लागले. तेव्हा निखील साठे याने जर कोणी माझ्या भांडणात मध्ये आले तर मी तुम्हाला देखील मारुन टाकीन, मी इथला भाई आहे, असे बोलून हातातील लोखंडी गज हवेत फिरवुन दहशत निर्माण केली. ते निघून गेल्यावर लोकांनी फिर्यादी यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या नाकावर डॉक्टरांनी तीन टाके घातले. निगडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन निखील साठे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे तपास करीत आहेत.
