Pune Crime News | कोथरूडमध्ये पाणीपुरी विक्रेत्या ज्येष्ठ महिलेची अडीच लाखांची सोनसाखळी हिसकावली
पुणे : Pune Crime News | पाणीपुरी खाण्याचा बहाणा करून एका ज्येष्ठ पाणीपुरी विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख ४७ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना कोथरूड परिसरात घडली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ६३ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमधील गुरुगणेशनगर परिसरात राहतात. त्या डुक्कर खिंड परिसरातील दोडके प्लाझा इमारतीसमोरील मोकळ्या जागेत पाणीपुरी विक्रीची गाडी लावतात.
सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास एक चोरटा पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने त्यांच्या गाडीजवळ आला. त्याने महिलेला पाणीपुरी देण्यास सांगितले. महिला कामात व्यस्त असल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन लाख ४७ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली.
महिलेने आरडाओरडा केला, मात्र चोरटा घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे पुढील तपास करत आहेत.
