Pune Crime News | महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाचे पेपर कर्मचार्‍यांनी फोडल्याचे उघड, शेवटच्या अर्ध्या तासात सोडविले 100 प्रश्न, छत्रपती संभाजीनगरमधील केंद्रावरील कर्मचार्‍यांसह तिघा परीक्षार्थींवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | देशभरात नीट तसेच एमपीएससी परीक्षांचे पेपर फुटल्यावरुन वादंग होत असतानाच त्याची लागण आता पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परिक्षांमध्येही झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रावर पुरविण्यात आलेल्या कर्मचार्‍यांनी परीक्षार्थीच्या संगनमताने हे पेपर फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २२, २३ व २९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेच्या पेपरबाबत तब्बल दीड महिने तपासणी केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या सहायक आयुक्त किशोरी प्रदीप तोडमल (वय ३९, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी परीक्षार्थी गजानन कैलास पाचे (Gajanan Kailas Pache), शिवशंकर गंगाधरराव शेळगावे (Shivshankar Gangadharrao Shelgave), विष्णुकांत कारबाजी वाघमारे (Vishnukant Karbaji Waghmare), कर्मचारी योगेश राजू राठोड Yogesh Raju Rathod (इलेक्ट्रिशन), विकास गायकवाड तसेच सोशल मीडियावर प्रश्नांची प्रतिमा प्रसारित करणारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर टाकण्यात आली होती. त्यावरुन पेपर फुटला असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होता. याबाबत ही परीक्षा घेणारी ‘आयबीपीएस’ संस्था हिला तपासणी करण्यास सांगितले होते. या संस्थेने परीक्षा दिलेल्या सर्व २० हजार ७३५ उमेदवारांच्या ऑनलाईन लॉगशिट तपासले. त्यात छत्रपती संभाजीनगरमधील आयकॉन डिजिटल झोन चिखलठाणा या केंद्रावरील तीन उमेवारांची पेपर सोडविण्याची पद्धत संशयास्पद दिसली. तिन्ही उमेदवारांनी शेवटच्या अर्ध्या तासात १०० प्रश्न सोडविले. त्याील ९० पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे बरोबर आल्याने ते भरतीत पात्र ठरले होते.

आयबीपीएम ने डिजिटल व सीसीटीव्ही तपासणीमध्ये त्यांनी पहिल्या अर्ध्या तासात केवळ प्रश्न वाचले. त्यानंतर ते स्वच्छतागृहात जाऊन आले. तेथून आल्यानंतर सर्व प्रश्न वेगाने सोडवत असल्याचे दिसले. अवघड प्रश्न सोडवताना त्यांनी रफशीटचा वापरही केला नाही. चष्म्यात कॅमेरा असलेले अत्याधुनिक यंत्र वापरुन प्रश्न स्कॅन करुन पुढे पाठवले. त्यानंतर स्वच्छतागृहात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून प्रश्न सोडविल्याची शक्यता आहे. कागदपत्र पडताळीसाठी आलेल्या ५४५ उमेदवारांची वैयक्तिक डेटालॉगही तपासणी केली. त्यात काही आढळले नाही. या तीन उमेदवारांना संस्थेचे कर्मचारी योगेश राठोड, विकास गायकवाड यांनी मदत केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पालमपल्ले तपास करीत आहेत.

You may have missed