Pune Crime News | पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या गुंडाला पकडताना गुंडाने तरुणाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी; पोलीस ठाण्याबाहेर साथीदाराने दिली जीवे ठार मारण्याची धमकी
पुणे : Pune Crime News | नशापाणी करुन जाणार्या येणार्या लोकांना त्रास देत असल्याची त्याच्या आईने तक्रार केल्यावर विमानतळ पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या गुंडाला पकडत असताना त्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. त्याच्या साथीदाराने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार विमानतळ पोलीस ठाण्यासमोर घडला.
आदित्य सतपाल वाल्मिकी Aditya Satpal Valmiki (वय १९), त्याचा साथीदार यासीन अन्वर शेख Yasin Anwar Shaikh (वय २०, रा. रामवाडी झोपडपट्टी हयात हॉटेलजवळ, रामवाडी) अशी गुन्हा दाखल असलेल्यांची नावे आहेत. याबाबत सलीम जिलानी शेख (वय ४४, रा़ जामा मस्जिदसमोर, रामवाडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार विमाननगरमधील दत्त मंदिर चौक येथे २९ ऑगस्ट रोजी रात्री पावणेदहा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य वाल्मिकी व यासीन शेख हे दोघे २९ ऑगस्ट रोजी दुपारपासून नशा पाणी करुन फिर्यादी यांच्या घराजवळील जामा मस्जिदजवळ बसले होते. ते जाणार्या येणार्या लोकांना विनाकारण शिवीगाळ करुन मारहाण करत होते. त्या परिसरात राहणारा मुलगा हसन सैफी याला त्यांनी मारहाण केली. सायंकाळी ७ वाजता हसन याच्या घरातील लोक आल्यावर हसन याने त्यांना आपल्याला आदित्य वाल्मिकी याने मारहाण केल्याचे सांगितले. आदित्य वाल्मिकी याच्या आईला ही गोष्ट माहिती पडल्यानंतर तिने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करुन त्यांचा मुलगा नशापाणी करुन वेडे चाळे करत आहे. त्यासाठी पोलीस मदत मागितली. काही वेळाने पोलीस आले. ते आदित्यला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. हे समजल्यावर फिर्यादीही पोलीस ठाण्यात गेले.
रात्री साधारण साडेनऊ वाजता फिर्यादी पोलीस ठाण्याच्या गेटवर असताना त्यांनी आदित्य याला पळून जात असताना पाहिले. ते व इम्तीयाज नूर खान हे त्याचा पाठलाग करुन लागले. दत्त मंदिर चौकात त्यांनी आदित्य याला पकडले. त्यावेळी तो फिर्यादी यांच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करु लागला. तेथे पडलेला दगड उचलून त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात टाकला. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यातून रक्त येऊ लागले, तरीही त्यांनी व इम्तीयाज खान यांनी त्याला पकडून ठेवले. त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. उपचारासाठी ते ससून रुग्णालयात जात होते. फिर्यादी हे आदित्य याची तक्रार करणार आहे, ही गोष्ट यासीन शेख याला माहिती झाल्याने त्याने फिर्यादी यांना पोलीस ठाण्याबाहेर शिवीगाळ करुन तु का आमच्यामध्ये येतो, असे बोलून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आदित्य वाल्मिकी याला अटक केली आहे. त्याचा साथीदार यासीन शेख हा फरार झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाट तपास करीत आहेत.
