Pune Crime News | बालपणीच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या; खराडी पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रियकराला केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | दोघे मुळचे पाटणा येथील राहणारे, हायस्कुलपासून एकत्र शिकलेले, दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेले, दोघांचेही प्रेमसंबंध होते, त्याला दिल्लीत नोकरी मिळाली, तर तिला पुण्यात, पुण्यात ती राहत असताना तो तिला काही दिवस भेटायला आला. त्यांच्यात वाद झाला, तेव्हा वाद वाढायला नको, म्हणून  तो घरातून बाहेर गेला, इकडे या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जान्हवी राजेशकुमार पाठक (वय २३, सध्या रा. खराडी, मुळ रा. बिहार) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. अमृतकुमार अरुणकुमार सिंह Amrit Kumar Arun Kumar Singh (वय २३, रा. गोविंदपुरी, दिल्ली) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. याबाबत जान्हवीच्या  काकांनी फिर्याद दिली आहे. ही घटना खराडी येथील रिव्हरडेल स्वीट बिल्डिंगमध्ये २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी पाठक आणि अमृतकुमार सिंह हे दोघे मुळचे बिहारमधील पाटणा येथील राहणारे आहेत. दोघे हायस्कुलपासून एकत्र होते. दोघे सॉफ्टवेअर इंजिनिअर झाले. या दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अमृतकुमार सिंह याला दिल्लीत नोकरी मिळाली. जान्हवी हिला ३ महिन्यांपूर्वी पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळाली. ती सुरुवातीला पी जी मध्ये इतर तरुणींबरोबर रहात होती. तिने पुण्यात भाड्याने एक फ्लॅट घेतला होता. त्याचा ताबा अद्याप मिळाला नव्हता. त्यामुळे ती तात्पुरती रिव्हरडेल स्वीट या इमारतीमध्ये रहात होती. २० ऑगस्ट रोजी अमृतकुमार सिंह हा तिला भेटायला पुण्यात आला. तो तिच्याबरोबर रहात होता. या दरम्यान त्यांच्यात भांडणे होत होती. 

अमृतकुमार सिंह याने जान्हवी हिला शिवीगाळ करुन मारहाण केली. २८ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्यात कडाक्याची भांडणे झाली. वाद आणखी वाढू नये, म्हणून अमृतकुमार सिंह हा घरातून निघून गेला. काही वेळाने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो परत आला. तर दरवाजा आतून बंद होता. त्याने आवाज दिला तरी जान्हवी हिने दरवाजा उघडला नाही. तेव्हा त्याने खिडकीतून पाहिले तर जान्हवी हिने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने दरवाजा उघडून आत प्रवेश करुन जान्हवीला खाली घेतले. अ‍ॅम्बुलन्समधून मणीपार हॉस्पिटलला नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच जान्हवी हिचा मृत्यु झाला होता. खराडी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस मणीपाल हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी अमृतकुमार सिंह याला ताब्यात घेऊन अटक केली, असे खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले.

You may have missed