Pune Crime News | पुणे : परदेशी नागरिकाची माहिती वेळेत न देणार्या जेडब्ल्यु मेरियट, हॉटेल शेरटन ग्रँडवर गुन्हा दाखल
पुणे : परदेशी नागरिक पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला आले असतानाही वेळेत पोलिसांकडे माहिती न देणार्या जे डब्ल्यु मेरियट (JW Marriott Hotel Pune) आणि हॉटेल शेरटन ग्रॅन्ड (Sheraton Grand Pune) या दोन हॉटेलवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी सर्वांना आदेश दिला होता की, आपल्याकडे राहण्यास आलेल्या व्यक्ती, भाडेकरु यांची माहिती पोलिसांना बंधनकारक आहे. अशी माहिती न देणार्यांवर कारवाई करण्याची मोहिम संपूर्ण पुणे शहरात सुरु केली आहे. या मोहिमेत पंचतारांकित हॉटेलने त्यांच्याकडे आलेल्या परदेशी नागरिकांची माहिती उशिराने नोंदविल्याचे समोर आले आहे.
सेनापती बापट रोडवरील जे डब्ल्यु मेरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये इटली देशाचे परकीय नागरिक क्रिस्टीन हुबेर CHRISTIAN HUBER हे ७ जून २०२६ रोजी वास्तव्यासाठी आले होते. त्यांच्या आगमनाची माहिती १७ जुलै २०२६ रोजी हॉटेल व्यवस्थापनाने दिली. यावरुन व्यवस्थापनाने ही महत्वाची माहिती हेतूपूर्वक निष्काळजीपणाने एकूण ३९ दिवस ११ तास (९४७ तास) दिरंगाईने भरुन नियमांचे उल्लंघन केले आहे.
हॉटेल शेरटन ग्रॅन्ड येथे चीनचे नागरिक क्यु लुओ Qi Luo हे १४ जून २०२६ रोजी सायंकाळी वास्तवासाठी आले होते. त्यांच्या आगमनाची माहिती हॉटेलने २८ जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजता भरल्याचे दिसून येते. इतकी महत्वाची माहिती हेतुपूर्वक निष्काळजीपणाने एकूण १४ दिवस १ तास (३३७ तास) दिरंगाईने भरुन नियमांचे उल्लंघन केले आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली चतु:श्रृंगी व बंडगार्डन पोलीस तपास करत आहेत.
