Mohan Joshi Pune Congress | फडणवीस साहेब आश्वासने खूप झाली, हिंजवडी मेट्रो कधी धावणार, ते सांगा – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : Mohan Joshi Pune Congress | हिंजवडी आयटी पार्क मधील सुविधांबद्दल आश्वासने देण्यापेक्षा हिंजवडी मेट्रो धावणार कधी? ते सांगा. असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार हे पिंपरी चिंचवड भागाला भेट देतात. तेव्हा हिंजवडी आयटी पार्कमधील सुविधांबाबत आश्वासने देतात, असा आजवरचा अनुभव आहे. हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सध्याचा शासकीय कारभार पहाता प्रत्यक्ष रस्ते होण्यासाठी ३, ४ वर्षांचा कालावधी लागेल. हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट झाला असून तिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या, रहिवाशांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे अजून वेळ न घालवता हिंजवडी मेट्रो त्वरीत चालू करावी, अशी आमची स्पष्ट मागणी आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी पुणे मेट्रो मार्गिका ३, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मेट्रो सुरक्षा आयुक्तांची मंजूरी मिळालेली आहे. मेट्रो च्या सर्व चाचण्याही झालेल्या आहेत. ही सर्व तयारी झालेली असताना मेट्रो का सुरू होत नाही? महामेट्रो च्या वेळापत्रकानुसार या चालू वर्षातील मार्च महिन्यापूर्वीच मेट्रो चालू होणे अपेक्षित होते. मुदत संपून त्यावर पाच महिनेही उलटून गेले, तरी मेट्रो धावू लागलेली नाही. मेट्रो प्रशासनाच्या मते तांत्रिक बाबी पूर्ण करून ३१ मे पूर्वीच मेट्रो धावू लागली असती. परंतु भाजप सरकारने मेट्रोला हिरवा कंदील दाखवायला वेळ का लावला आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.
भाजपला उदघाटनाच्या निमित्ताने मिरवून घ्यायचे आहे, म्हणून मेट्रो थांबवली आहे का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे, त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
